Onion : नगर : राहता येथील बाजार समितीत मंगळवारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढूनही कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक २८०० रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला आहे.
सर्वोच्च दर
बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात कांद्याची एकूण ९९६६ गोण्यांची आवक झाली. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या कांद्याला २२०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर इतर दर्जानुसार वेगवेगळ्या गोण्यांना प्रति क्विंटल किमान ९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. यासोबतच बाजारात २२३१ कॅरेट डाळिंबाची, १५ क्विंटल गव्हाची आणि १७ क्विंटल तुरीची आवक होऊन त्यांनाही चांगला दर मिळाला आहे.
नक्की पहा : सुपा येथे एसटी बस पलटल्याने अपघात; सुप्याच्या उपसरपंचांनी भर पावसात केले मदतकार्य
कांद्याची आवक कायम (Onion)
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच भागांत कांदा लागवडीला प्राधान्य दिले जाते. नाशिकनंतर सर्वाधिक कांदा उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख आहे. तसेच शेजारच्या सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यांतही कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कायमच लक्षणीय असते. गेल्या वर्षभरापासून कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मागणीत वाढ झाल्याने दरात काहीशी सुधारणा होताना दिसत आहे.



