Pathardi | भरदिवसा धूमस्टाईलने दोन तोळ्यांचे मिनी गंठण लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

0

Pathardi | पाथर्डी : पाथर्डी ( Pathardi ) शहरातील आनंद नगर परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ११) सायंकाळी घडली. या प्रकारात हिसका बसल्याने संबंधित महिला रस्त्यावर कोसळल्या. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचा – हॉटेल व्यवसायिकाचा कोयत्याने वार करून खून; श्रीरामपूर शहरात भरदिवसा घडला थरार

चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला ( Pathardi )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथील संगीता सुधाकर पाखरे (वय ५३) या त्यांच्या मैत्रीण अर्चना खेडकर यांच्यासह पायी जात होत्या. सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास शेवगाव रस्त्यावरील अर्जुन बाबा मंदिराजवळून आनंदनगरकडे जात असताना स्पोर्ट्स दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. योग्य संधी साधून मागे बसलेल्या दोघांपैकी एकाने संगीता पाखरे यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे मिनी गंठण जोराने हिसकावले.अचानक झालेल्या या प्रकारात तोल जाऊन पाखरे या रस्त्यावर पडल्या. अर्चना खेडकर यांनी आरडाओरडा केला. मात्र, आरोपी क्षणार्धात भरधाव वेगाने पसार झाले.

नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना

मिनी गंठण लंपास ( Pathardi )

या घटनेत दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये तिन्ही संशयित कैद झाल्याची माहिती मिळाली आहे. फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

याप्रकरणी संगीता सुधाकर पाखरे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, आनंदनगर परिसरात यापूर्वीही सोन्याचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी यांना लुटल्याची घटना तीन वर्षापूर्वी घडली होती.त्यानंतर पुन्हा भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

गुन्ह्यांचा छडा लागेना; धूमस्टाईल चोरट्यांचे पोलिसांना आव्हान ( Pathardi )

पाथर्डी शहरात दुचाकीवरून येत नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या ‘धूम स्टाईल’ चोऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात शेवगाव रस्त्यावरील एका व्यापाऱ्याच्या दुकानात ग्राहक म्हणून घुसून सुमारे साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून नेण्यात आली होती. त्यानंतर साईनाथनगर परिसरातील घरासमोर असलेल्या एका महिला व्यापाऱ्याच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न झाला होता. काही दिवसांतच त्याच परिसरातील आणखी एका व्यापाऱ्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली होती. आता आनंदनगर परिसरात पुन्हा अशाच पद्धतीने एक लाख रुपये किमतीचे मिनी गंठण लुटण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या मालिकेतील बहुतांश गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसल्याने धूमस्टाईल चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here