Phulvara Marathi Movie : लावणीचा ठेका, लोककलेचा बाज आणि अस्सल मराठी मातीचा गंध… तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज (Zee Studios) आणि रवी जाधव (Ravi Jadhav) ही जोडी लावणीप्रधान चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘नटरंग’नंतर आता ‘फुलवरा’च्या माध्यमातून अस्सल मराठी लावणीचा नवा अध्याय मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘फुलवरा’ या चित्रपटाच्या (Phulvara Marathi Movie) प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ जानेवारी २०२७ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पोस्टरनेही चित्रपटाची उत्सुकता वाढवली
या घोषणेसोबत समोर आलेल्या पोस्टरनेही चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. पूजेच्या ताटात विराजमान असलेला देवी अंबाबाईचा मुखवटा आणि त्यासोबतची ओळ ‘आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्या आणि अस्सल मराठी लावणीला बळ द्या’ ही चित्रपटाची झलक देते. विशेष म्हणजे, या टॅगलाईनमधील ‘अस्सल मराठी लावणी’ या शब्दांवर विशेष भर देण्यात आला असून लावणीचा पारंपरिक बाज आणि तिचं आजच्या काळाशी असलेलं नातं ‘फुलवरा’मधून कशा पद्धतीने समोर येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र ‘फुलवरा’ची गोष्ट नेमकी कोणत्या वळणावर जाणार, लावणीच्या जगण्याशी आणि आजच्या काळाशी तिची सांगड कशी घातली जाणार, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटातील कलाकारांची नावेही अद्याप समोर आलेली नाहीत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
‘द फोक आख्यान’च्या जोडीने दिलं संगीत (Phulvara Marathi Movie)
लोककलेच्या विश्वात आपल्या वेगळ्या सादरीकरणाने लक्ष वेधून घेणाऱ्या ‘द फोक आख्यान’च्या हर्ष-विजय या संगीतकार जोडीने ‘फुलवरा’ला संगीत दिलं आहे. तर ‘द फोक आख्यान’चे लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत. लोककलेचा सखोल अभ्यास, नव्या पिढीची लोकसंगीताकडे पाहाण्याची दृष्टी आणि रवी जाधव यांचा या कलेशी असलेला प्रदीर्घ अनुभव यांचा संगम ‘फुलवरा’मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लावणीचा केवळ रंगमंचीय आविष्कार नव्हे, तर तिच्या मुळाशी असलेली संस्कृती, परंपरा आणि आजच्या काळातील तिचं बदलतं रूप याकडेही हा चित्रपट वेगळ्या नजरेने पाहाणार असल्याचं जाणवतं.
‘फुलवरा’बद्दल दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, ‘नटरंग’नंतर तब्बल सोळा वर्षांनी पुन्हा एकदा तमाशापट करण्याचं धाडस करतोय. ‘धाडस’ यासाठी, कारण तमाशा हा महाराष्ट्राच्या लोककलेचा प्राण आहे आणि लावणी ही त्या लोककलेची सम्राज्ञी! या समृद्ध कलापरंपरेवर चित्रपट साकारणं ही मोठी जबाबदारी आहे. याच जबाबदारीचं भान ठेवून आम्ही प्रेक्षकांसाठी ‘फुलवरा’ साकारला आहे.
‘नटरंग’ची कथा सत्तरच्या दशकात घडते, तर ‘फुलवरा’ची कथा २०१५ मधील आहे. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांत महाराष्ट्रातील तमाशा काळानुरूप बदलत गेला. मात्र, तमाशा कलावंतांची आपली ‘अस्सल मराठी’ कला जपण्याची आणि ती प्रेक्षकांसमोर सादर करण्याची धडपड आजही तितकीच जिवंत आहे. त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यागही तितकाच मोठा आहे. अनेक गुणी कलावंतांच्या फुलांनी सजलेल्या आमच्या या ‘फुलवरा’ला प्रेक्षक ‘नटरंग’ प्रमाणेच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देतील आणि ‘अस्सल मराठी’ लावणीला नवं बळ देतील, अशी मनापासून आशा आहे.
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “झी स्टुडिओज, रवी जाधव आणि लावणीप्रधान चित्रपट हे समीकरण नटरंगनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळणार याचा विशेष आनंद आहे. या चित्रपटाची संकल्पना ऐकल्यापासूनच त्याबद्दल आमच्या मनात कमालीची उत्सुकता होती. फुलवराच्या निमित्ताने झी स्टुडिओजची नव्या वर्षाची सुरुवात अत्यंत आश्वासक असेल याचा आम्हाला विश्वास आहे. मराठी लावणीचं एक अस्सल रुप यातून प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि ते सर्वांना आवडेल याबद्दल मनात कोणतीही शंका नाही.”
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार असून पडद्यामागची गोष्ट, कलाकारांची मांदियाळी आणि लावणीचा नेमका कोणता रंग ‘फुलवरा’ खुलवणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.



