Sujay Vikhe on Neela Vikhe : सुजय विखेंचे खासदारकीचे शल्य कायम; स्वीडनमधील बहिणीच्या खासदारकीवरून केलेले वक्तव्य चर्चेत

0
Sujay Vikhe on Neela Vikhe : सुजय विखेंचे खासदारकीचे शल्य कायम; स्वीडनमधील बहिणीच्या खासदारकीवरून केलेले वक्तव्य चर्चेत
Sujay Vikhe on Neela Vikhe : सुजय विखेंचे खासदारकीचे शल्य कायम; स्वीडनमधील बहिणीच्या खासदारकीवरून केलेले वक्तव्य चर्चेत

Sujay Vikhe on Neela Vikhe : नगर : अहिल्यानगरमधील विखे पाटील घराण्याने आता आंतरराष्ट्रीय राजकारणातही आपली छाप उमटवली आहे. विखे पाटील कुटुंबातील नीला विखे पाटील यांनी स्वीडनमध्ये खासदारकी मिळवल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या यशाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, त्यांचे चुलत बंधू आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी यावर केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खासदारकीपासून आपल्याला कोणीही दूर ठेवू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

 श्रीरामपूरच्या ‘रणरागिणी’ आईचे धाडस, लेकासाठी बिबट्याशी थेट भिडली!

आपल्याला भारतात पाडलं तर आपण स्वीडनमध्ये खासदार झालो

नीला विखे पाटील यांच्या स्वीडनमधील खासदारकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुजय विखे यांनी विखे पाटील घराण्याचा राजकीय वारसा आणि खासदारकीबाबतची आपली भूमिका अधोरेखित केली. त्यांच्या वक्तव्यातून खासदारकीच्या विषयावरील त्यांची भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. सुजय विखे म्हणाले, “आपल्याला खासदारकीपासून कोणी लांब ठेवत नाही. आपल्याला भारतात पाडलं तर आपण स्वीडनमध्ये खासदार झालो. काही झालं तरी खासदारकी सोडायची नाही.” त्यांनी पुढे विखे पाटील घराण्याच्या राजकीय वारशाचा उल्लेख करताना, “हे विखे पाटील घराण्याचे रक्त आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांची पुण्याई आहे,” असे म्हटले. तसेच, “अख्खा महाराष्ट्र जरी आमच्या विरोधात एक झाला, आणि आमच्या नावापुढील खासदार नाव काढायचा प्रयत्न केला तरी आम्ही कुठून ना कुठून खासदारकी मिळवणारच…” असे विधानही त्यांनी केले.

काका महाराष्ट्रात मंत्री, अन पुतणी झाली स्वीडनमध्ये खासदार! विखे पाटील घराण्याची ही आंतरराष्ट्रीय स्टोरी नक्की काय आहे?

खासदारकीच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा (Sujay Vikhe on Neela Vikhe)

सुजय विखे यांच्या या विधानाची चर्चा होण्यामागे त्यांची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील पार्श्वभूमीही महत्त्वाची ठरते. त्या निवडणुकीत अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता विखे पाटील कुटुंबातील नीला विखे पाटील यांनी स्वीडनमध्ये खासदारकी मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांचे विधान समोर आले आहे. एका बाजूला परदेशातील खासदारकीच्या माध्यमातून विखे पाटील घराण्याचे नाव आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेत आले आहे, तर दुसरीकडे सुजय विखे यांनी खासदारकीबाबत केलेल्या विधानामुळे त्यांच्या राजकीय महत्वकांक्षेची चर्चा रंगू लागली आहे.

“भारतात पडलो तर स्वीडनमध्ये मिळवू” आणि “काही झालं तरी खासदारकी सोडायची नाही,” या त्यांच्या विधानांमुळे राजकीय जाणकारांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. नीला विखे पाटील यांच्या राजकीय यशाच्या निमित्ताने सुजय विखे यांनी केलेले हे विधान सध्या अहिल्यानगरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.