Police : नगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षा २०२३ चा निवड निकाल ३० एप्रिल २०२६ रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत नगर तालुक्यातील बारादरी येथील सुपुत्र सचिन बबन वाघचौरे याने घवघवीत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याने ४०० पैकी ३६३ गुण मिळवून सर्वसाधारण गुणवत्ता यादीत १२३ वा क्रमांक पटकावला आहे.
हेही वाचा : राहुरीतील तीन एटीएम मशीनची माथेफिरूकडून तोडफोड
कष्टकरी पार्श्वभूमी
सचिन याचे आई-वडील शेतीमध्ये कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी जिवापाड मेहनत घेतली. सचिनचे प्राथमिक शिक्षण बारादरी येथील आश्रम शाळेत झाले तर पुढील उच्च शिक्षण त्यांनी अहिल्यानगर येथे महाविद्यालयात पूर्ण केले. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत सचिन ने आज हे मोठे यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
नक्की पहा : गोडाऊनला भीषण आग; शेवगावात पसरले धुराचे लोट
जिद्दीच्या जोरावर मजल (Police)
सचिन वाघचौरे याची २०११ मध्ये मुंबई पोलिस दलात निवड झाली होती. पोलीस दलात सेवा बजावत असतानाच त्याने वरिष्ठ पदावर जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. कर्तव्यावर असतानाही अभ्यासातील सातत्य आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने एमपीएससीची ही विभागीय परीक्षा दिली. ६१५ जागांसाठी झालेल्या या अत्यंत चुरशीच्या परीक्षेत त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर पीएसआय पदापर्यंत मजल मारली आहे. त्याच्या या यशाबद्दल गावकरी, मित्रपरिवार आणि पोलीस दलातील सहकाऱ्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



