Prakash Abitkar | नगर : “भविष्यात सामान्य माणसाला दवाखान्याची व कोर्टाची पायरी चढण्याची गरज पडणार नाही, इतकी सक्षम यंत्रणा आरोग्य विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येईल,” असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर ( Prakash Abitkar ) यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा : फॅब्रिकेशन दुकानातुन १ लाख २४ हजारांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हिवरे बाजार येथील कार्यक्रम
आदर्श गाव हिवरे बाजार येथे पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून दुष्काळी पार्श्वभूमीवर आयोजित ‘दुष्काळात आनंददायी आरोग्य’ तपासणी, मार्गदर्शन व उपचार शिबिरात परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ९५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१० घरांना भेट देऊन तपासणी
मंत्री आबिटकर म्हणाले की, आजार झाल्यानंतर तपासणी करण्याऐवजी वेळेवर तपासणी होणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. ‘प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर’ या सूत्रानुसार सीएचओ यांनी दररोज किमान २० घरांना आणि आशा स्वयंसेविकांनी दररोज १० घरांना भेट देऊन तपासणी करावी. “एकही रुग्ण आजारी पडू नये, एकही प्रसूती बाहेर होऊ नये तसेच अनावश्यक शस्त्रक्रियांची वेळ येऊ नये, इतके सामर्थ्य आमच्या आरोग्य विभागात आहे. ‘आरोग्य संवाद यात्रे’च्या माध्यमातून लोकांचे प्रश्न, सूचना व नाराजी समजून घेऊन योग्य उपाययोजना देण्यावर भर दिला जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात असून, नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तामिळनाडूच्या तुलनेत महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये या योजनेखाली होणाऱ्या उपचारांचे प्रमाण वाढवून ते ७० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कर्करोगासारख्या उपचारांसाठी ‘पेट स्कॅन’चा निर्णय तसेच न्यूरो व ऑर्थो शस्त्रक्रियांचे बजेट वाढवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तरुणपणी राळेगणसिद्धीतील जलसंधारणाचे काम व पोपटराव पवार यांचे विचार ऐकून प्रेरणा मिळाल्याचे सांगत आबिटकर यांनी हिवरे बाजारच्या ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे विशेष कौतुक केले. “प्रत्येक सरपंचाने या ग्रामसचिवालयाला भेट द्यावी इतकी देखणी इमारत येथे उभारली आहे. पोपटराव पवार यांच्या संकल्पनेला साथ देणाऱ्या हिवरे बाजारच्या ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो,” असे ते म्हणाले.यावेळी पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी ‘दुष्काळात आनंददायी आरोग्य’ शिबिराची संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले की, “शिबिरात केवळ तपासणी करून आम्ही थांबणार नाही, तर संबंधित रुग्ण आजारातून पूर्णपणे बरा होईपर्यंत मी स्वतः काळजी घेईन आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार काशिनाथ दाते यांनी आपल्या मनोगतात हिवरे बाजार व राळेगणसिद्धी ही दोन्ही आदर्श गावे आपल्या मतदारसंघात असल्याचा अभिमान व्यक्त केला. शिबिरासाठी अहिल्यानगर शहरातील नामांकित डॉक्टर्स उपलब्ध असून ते रुग्णांची योग्य काळजी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजयजी कंधेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. ज्योती मांडगे, डॉ. विनोद काकडे, डॉ. एस. एस. दीपक, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. संदीप गाडे, डॉ. खालकर, डॉ. सोमीनाथ गोपाळघरे, अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. रेखा झावरे, डॉ. राघवेंद्र थेटे, डॉ. राहुल जाधव, डॉ. राघवेंद्र राजेश्वरकर, डॉ. नंदकुमार पानसे, डॉ. नारायण वायभासे, डॉ. संदीप चोपडे, जालिंदर बोरुडे, डॉ. प्रशांत वाघ, डॉ. योगेश पवार, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. शिवानी कुलकर्णी तसेच गटविकास अधिकारी अक्षय गार्डे, प्रसन्न पवार, सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन जालिंदर चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, एस. टी. पादीर सर उपस्थित होते.तसेच हिवरे बाजार परिसरातील पिंपळगाव वाघा, चास, भोयरे पठार, भोयरे खुर्द, दैठणे गुंजाळ, टाकळी खातगाव, खातगाव टाकळी, जखणगाव, हिंगणगाव, निमगाव वाघा, वडगाव आमली, भाळवणी आणि सारोळा आडवाई येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग घेतला.



