Praveen Lokhande: कार्यालय ते निवासस्थान पायी जाण्याचा पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांचा निर्णय 

पंतप्रधानांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद

0

Praveen Lokhande: कर्जत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री यासह अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली. यासह अनेक व्हीआयपी राजकारण्यांनी देखील हाच कित्ता गिरवला आहे. याच अनुषंगाने कर्जतचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे (Praveen Lokhande) यांनी देखील उपअधीक्षक कार्यालय ते शासकीय घर येण्या-जाण्यासाठी शासकीय वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता.१५) संध्याकाळी ते पायी घरी जाताना आढळले. 

अवश्य वाचा-  नगर-पुणे महामार्गावर चार वाहनांचा साखळी अपघात; एसटी, कंटेनर व कारच्या धडकेत ३० ते ३५ जण जखमी

पंतप्रधानांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद (Praveen Lokhande)

इराण- अमेरिका, इस्रायल या आखाती देशाच्या युद्धाची झळ काही प्रमाणात भारतास देखील बसल्याची चिन्हे आता उमटत असून पंतप्रधान मोदी यांनी इंधन, तेल आणि उर्जाची साधने कमी वापरण्याचे आवाहन जनतेस केले. यासह राजकारण्यांनी देखील डामडौल न करता शक्य असेल त्या ठिकाणी बचतीचा मार्ग अवलंब करावा, असे आवाहन केले होते. राज्याचे मुख्यमंत्री यासह अनेक मंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत इलेक्ट्रिक वाहने तसेच आपल्या लवाजम्यातील वाहने कमी केले. याच पार्श्वभूमीवर अवघ्या पंधरा दिवसांवर आपली सेवानिवृत्ती जवळ आली असताना कर्जतचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी देखील शुक्रवारपासून शासकीय निवासस्थान ते पोलीस उपअधीक्षक कार्यालय येण्या-जाण्यासाठी शासकीय वाहनांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी संध्याकाळी ते कार्यालयातून आपल्या कर्मचाऱ्यांसोबत पायी जाताना आढळले. सध्या इंधनाचे भाव आणि होणारी टंचाई यावर अधिकाऱ्यांनी देखील शक्य होईल तेवढे वाहनांचा वापर कमी करीत शासकीय तिजोरीवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यास पुढे येत असल्याचे नक्कीच सुखावह आहे.