Vankute Gram Panchayat : वनकुटे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणात कारवाईची मागणी; दाते यांच्याकडे ग्रामस्थांचे निवेदन

भविष्यात आणखी आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता

0
Vankute Gram Panchayat : वनकुटे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणात कारवाईची मागणी; दाते यांच्याकडे ग्रामस्थांचे निवेदन
Vankute Gram Panchayat : वनकुटे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणात कारवाईची मागणी; दाते यांच्याकडे ग्रामस्थांचे निवेदन

Vankute Gram Panchayat : पारनेर : तालुक्यातील वनकुटे ग्रुप ग्रामपंचायतीतील (Vankute Gram Panchayat) कथित लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार (Financial Misconduct) प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला असून, या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित आर्थिक गैरवापर, पदाचा गैरवापर तसेच चौकशी अहवालांमधील निष्कर्षांच्या आधारे संबंधितांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नक्की वाचा : नगर-पुणे महामार्गावर चार वाहनांचा साखळी अपघात; एसटी, कंटेनर व कारच्या धडकेत ३० ते ३५ जण जखमी

विविध स्तरांवर केल्या तक्रारी

याबाबत संतोष बबन केदारी, सुरेश सिताराम गागरे आणि बबन सखाराम हुलावळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार दाते यांना निवेदन सादर केले. या निवेदनात गटविकास अधिकारी, पारनेर यांनी सादर केलेल्या १४ ऑक्टोबर २०२५ आणि ७ एप्रिल २०२६ च्या चौकशी अहवालांचा संदर्भ देण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वनकुटे ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार व पदाचा गैरवापर झाल्याबाबत मागील अनेक महिन्यांपासून विविध स्तरांवर तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अनेक अनियमित बाबी निदर्शनास आल्याचा दावा (Vankute Gram Panchayat)

त्यानंतर दोन स्वतंत्र चौकशी अहवाल सादर करण्यात आले असून, त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनेक अनियमित बाबी निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.मात्र, चौकशी अहवाल सादर होऊनही संबंधितांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढे होणाऱ्या आर्थिक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रशासकीय निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भविष्यात आणखी आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता

ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे स्पष्ट मागणी केली आहे की, संपूर्ण चौकशी व अंतिम कारवाई पूर्ण होईपर्यंत वनकुटे ग्रामपंचायतीची कोणतीही देयके, बिले किंवा निधी अदा करण्यात येऊ नयेत. तसेच नवीन विकासकामांना मंजुरी देणे, कामांचे वाटप करणे तसेच कर्मचारी भरती प्रक्रिया राबविणे तात्पुरते थांबविण्यात यावे. अन्यथा भविष्यात आणखी आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांची थेट आमदारांकडे धाव

दरम्यान, वनकुटे ग्रामपंचायतीतील या कथित गैरव्यवहार प्रकरणामुळे तालुक्यात मोठी चर्चा रंगली असून, आता ग्रामस्थांनी थेट आमदारांकडे धाव घेतल्याने या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार काशिनाथ दाते या प्रकरणात कोणती भूमिका घेतात व प्रशासनाला कोणत्या सूचना देतात, याकडे ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.