खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश
Pune-Ahilyanagar Railway Line : अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या (Pune-Ahilyanagar Railway Line) दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली असून, पुणे-अहिल्यानगर या १३४ किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाचा अंतिम स्थान सर्वेक्षण (Final Location Survey-FLS) पूर्ण झाला आहे. तसेच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर या ११० किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गासाठी FLSला मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी खासदार नीलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी २०२४ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यामुळे महत्त्वाचे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लंके यांनी अहिल्यानगरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सातत्याने केंद्र सरकारच्या पातळीवर लावून धरला. केवळ पत्रव्यवहारापुरता पाठपुरावा न करता लोकसभेच्या सभागृहात अनेकदा या मागणीला वाचा फोडली. तसेच रेल्वे मंत्रालयाशी संबंधित बैठका आणि रेल्वे समितीच्या बैठकींमध्ये सक्रिय सहभाग घेत प्रकल्पांची सद्यस्थिती, सर्वेक्षण, डी पी आर आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला.
या मार्गामुळे सक्षम रेल्वे संपर्क मिळण्यास मदत
पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण होणे हा प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रशासकीय व मंजुरी प्रक्रियेला पुढे जाण्यास आवश्यक असलेली दिशा स्पष्ट झाली आहे. या मार्गामुळे अहिल्यानगरला पुणे शहराशी अधिक सक्षम रेल्वे संपर्क मिळण्यास मदत होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला मंजुरी (Pune-Ahilyanagar Railway Line)
त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर ११० किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेलाही गती मिळण्याची अपेक्षा आहे. अंतिम स्थान सर्वेक्षणच्या आधारे पुढील टप्प्यात डीपीआर आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
खासदार निलेश लंके म्हणाले, (Pune-Ahilyanagar Railway Line)
अहिल्यानगरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हा केवळ वाहतुकीचा विषय नसून जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाशी निगडित आहे. २०२४ मध्ये खासदार झाल्यापासून पुणे-अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेमार्गांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. लोकसभेत हा विषय अनेक वेळा मांडला तसेच संबंधित बैठका आणि रेल्वे समितीच्या माध्यमातून या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्गाचा अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण झाल्याची आणि छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणला मंजुरी मिळाल्याची माहिती अहिल्यानगरच्या जनतेसाठी समाधानाची बाब आहे. मात्र, हा प्रवास येथे थांबणार नाही. प्रत्यक्ष रेल्वेमार्गाचे काम सुरू होऊन त्याचा लाभ जनतेला मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अहिल्यानगरच्या रेल्वे विकासासाठी इतर महत्त्वाचे प्रकल्पही सुरू आहेत. दौंड–मनमाड २३६ किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
अहिल्यानगर–बीड–परळी वैजनाथ या २६१ किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाच्या अहिल्यानगर-बीड-बडवाणी या २०१ किलोमीटरच्या भागाचे काम सुरू असून, प्रकल्पाच्या उर्वरित कामातही प्रगती होत आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ५,८०० कोटी रुपये आहे. याशिवाय धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या २४० किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गासाठीही अंतिम स्थान सर्वेक्षणला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा तसेच राज्यातील प्रमुख शहरांशी अहिल्यानगरची सक्षम रेल्वे जोडणी झाल्यास प्रवासी वाहतुकीसोबतच शेतमाल वाहतूक, व्यापार-उद्योग, रोजगारनिर्मिती आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
अहिल्यानगरच्या रेल्वे विकासासाठी दिल्लीपासून स्थानिक पातळीपर्यंत प्रत्येक स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लोकसभेत आवाज उठविण्यापासून संबंधित समित्या आणि मंत्रालयाच्या बैठकींपर्यंत उपलब्ध प्रत्येक संधीचा उपयोग करून अहिल्यानगरला हक्काची आणि सक्षम रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार खासदार लंके यांनी व्यक्त केला.



