नगर : रेल्वे तिकिटाचे ऑनलाईन आरक्षण (Railway Ticket Booking IRCTC) करताना येणारे अनावश्यक पॉपअप्स, वारंवार भरावा लागणारा कॅप्चा आणि तिकीट बुक होण्यासाठी लागणारा अधिक वेळ यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांचा हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंग (Ticket Booking) सुविधेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाची एक सुधारित ‘बीटा आवृत्ती’ (Beta version) तयार करण्यात आली असून, ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नक्की वाचा : कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार आर्थिक सहाय्य; फडणवीस सरकारचा निर्णय
विद्यार्थ्यांच्या सूचनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग (Railway Ticket Booking IRCTC)

जयपूर येथील ‘मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील अनेक गंभीर त्रुटी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. यानंतर रेल्वेने तातडीने पावले उचलत १५ जुलैपर्यंत या संकेतस्थळात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार,आयआरसीटीसी आणि रेल्वे सूचना प्रणाली केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जयपूरमध्ये या विद्यार्थ्यांसमोर नवीन संकेतस्थळाची बीटा आवृत्ती सादर केली असून त्यावर विद्यार्थ्यांचे अभिप्राय मागवले आहेत.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे ५० हजार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार!
नव्या संकेतस्थळात नेमके काय बदलणार? (Railway Ticket Booking IRCTC)
प्रवाशांचा बुकिंगचा अनुभव सुलभ करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
कॅप्चा आणि पॉपअप्स हद्दपार: तिकीट बुक करताना मध्येच येणारे अनावश्यक कॅप्चा, पॉपअप्स आणि जड ग्राफिक्स काढून टाकण्यात आले आहेत.
जागांची उपलब्धता एकाच स्क्रीनवर: प्रवाशांना आता सर्व वर्गांमधील उपलब्ध जागांची माहिती वेगवेगळ्या पर्यायांवर न जाता एकाच स्क्रीनवर पाहता येईल.
फास्ट बुकिंग सुविधा: तिकीट बुक करण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या म्हणजेच स्टेप्स कमी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अवघ्या काही सेकंदांत तिकीट बुक होईल.
एकदाच माहिती भरावी लागणार: जे प्रवासी वारंवार प्रवास करतात, त्यांना प्रवाशांची माहिती पुन्हा पुन्हा टाईप करावी लागणार नाही. ती माहिती एकदाच सेव्ह राहील.



