Rainfall : धरणांमधून पाणी सोडताना प्रशासनाशी समन्वय राखावा : डॉ. राधाकृष्ण विखे

0
Rainfall : धरणांमधून पाणी सोडताना प्रशासनाशी समन्वय राखावा : डॉ. राधाकृष्ण विखे
Rainfall : धरणांमधून पाणी सोडताना प्रशासनाशी समन्वय राखावा : डॉ. राधाकृष्ण विखे

Rainfall : नगर : मागील दोन दिवसांपासून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रात झालेला पाऊस, धरणांमधील पाणीसाठा, संभाव्य पूरस्थिती व आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करावे. संभाव्य परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. धरणांमधून पाणी सोडताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाशी आवश्यक समन्वय राखावा. प्रत्येक धरणाचा आपत्कालीन कृती आराखडा अद्ययावत ठेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी दिले.

हेही वाचा : पाथर्डी तालुक्यातील पाच गावांत कथित गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ; शेकडो ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे धाव

राज्यातील पुरस्थितीचा आढावा

जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी आज मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रातील पावसाची स्थिती व धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. या बैठकीस पुणे व नाशिक विभागातील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, दोन्ही महामंडळांचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील अतिवृष्टीची सद्यस्थिती, पूरपरिस्थिती, धरणांमधील जलसाठा, प्रमुख नदीखोऱ्यांतील पाण्याची आवक, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार धरणांचे व्यवस्थापन तसेच आषाढी पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या पाण्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

नक्की पहा : सिद्धटेक येथील भीमानदीच्या पुलास लागले पाणी; तालुका आपत्ती व्यवस्थापन सतर्क

जाणून घ्या पाण्याची आवक (Rainfall)

कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे कृष्णा व गोदावरी खोऱ्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून दोन्ही विभागांतील धरणांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती दोन्ही महामंडळांच्या कार्यकारी संचालकांनी दिली. पुणे विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ १२ टक्के होता. तो ७ जुलैपर्यंत ३१ टक्क्यांवर पोहोचला असून अवघ्या पाच दिवसांत सुमारे ८०.८ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. खडकवासला धरण समूहात ७.५४ टीएमसी, पवना धरणात ४.८४ टीएमसी, भामा आसखेड धरणात ४.१५ टीएमसी, वीर धरण समूहातील भाटघर धरणात ५.१६ टीएमसी, वीर धरणात २.०१ टीएमसी व नीरा देवघर धरणात २.६२ टीएमसी पाण्याची आवक झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.