कर्जत : लक्ष्मी पुजनाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवा नेते प्रशांत शिंदे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीची साथ सोडत आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा रविवारी (ता. १२) आमदार प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी झाला. प्रशांत शिंदे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. जवळा ग्रामपंचायतवर आता भाजपचा कब्जा झाला आहे.
हे देखील वाचा : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड
युवा नेते प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशील सुभाष आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शीतल प्रशांत शिंदे, सोनाली राहुल पाटील, रफिकभाई शेख, राधिका मारूती हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे या सर्वांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी सत्कार झाला.
नक्की वाचा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावशिवार जलपरिपूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमावेळी नगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद दादा कार्ले, संचालक सचिन घुमरे, डाॅ गणेश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचरणे, डाॅ सुनील गावडे, तुषार पवार, अनिल गदादे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, बापुराव ढवळे, जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख मुरली हजारे, काकासाहेब वाळुंजकर, दशरथ कोल्हे आदी उपस्थित होते.
जवळा ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही पक्षाचे लेबल लावले नव्हते, निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली आणि जिंकली. आता गावाचा विकास करायचा असेल आणि गावाला वेगळेपण द्यायचे असेल तर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. शिंदे साहेब नेहमी काम करताना मोकळीक देतात. यामुळे पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एकमुखी निर्णय घेत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज ग्रामपंचायत पदाधिकारी व शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
– प्रशांत शिंदे, जवळा ग्रामविकास पॅनल
जवळा गावाच्या विकासासाठी आजवर भरघोस निधी दिला आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाच्या संदर्भात कुठलीही अडचण येऊ देणार नाही. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पुन्हा पक्षात प्रवेश केलाय. त्या सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत. पक्षात आलेल्या सर्वांचा मानसन्मान राखला जाईल. तुमच्या स्वागतालाच २५ लाख रुपयांचा निधी देऊन तुमचा सन्मान केला आहे.
– आमदार प्रा.राम शिंदे