
Ramanandacharya Narendracharya Maharaj : अहिल्यानगर : अंधश्रद्धेला (Superstition) बळी न पडता अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालून जीवन जगणे गरजेचे आहे. मन आध्यात्मिक, डोळे विज्ञानवादी आणि बुद्धी वास्तववादी असावी, असा संदेशही महाराजांनी दिला. अहिल्यानगर शहरातील निशा लॉन्स येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज (Ramanandacharya Narendracharya Maharaj) यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याला प्रारंभ झाला. या सोहळ्याला आमदार संग्राम जगताप, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, महापौर ज्योती गाडे, धनश्री सुजय विखे यांच्यासह नगरसेवकांनी उपस्थित राहून सदिच्छा भेट दिली. यावेळी श्रीक्षेत्र नाणीजधाम ट्रस्टच्या उपक्रमात सहभागी झालेल्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला.
नरेंद्राचार्य महाराज म्हणाले,
समाजात अंधश्रद्धेमुळे अनेक जण आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. आतापर्यंत २६८ नागरिकांनी देहदानाचा संकल्प केला असून, त्यापैकी २६ नागरिक अहिल्यानगरमधील आहेत. या देहदान करणाऱ्या नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन गरजेचे (Ramanandacharya Narendracharya Maharaj)
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीबाबत विचारले असता, कुंभमेळ्यासाठी शासनाने कायमस्वरूपी जागा आरक्षित ठेवण्याचे नियोजन करावे, असे महाराज म्हणाले. प्रयागराज, हरिद्वार आणि उज्जैन येथे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही नियोजन करावे. विकासकामांसोबत वृक्षारोपण आणि पर्यावरणाचे संवर्धनही प्रशासनाने केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर बोलताना महाराजांनी संस्कार आणि नीतीमूल्यांची गरज अधोरेखित केली. चोरीसारख्या घटनांना धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनातील निष्काळजीपणाही कारणीभूत ठरू शकतो. देवाचा यात दोष नसून माणसाच्या प्रवृत्तीत बदल घडविण्यासाठी समाजप्रबोधन आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत अध्यात्म, संस्कृती आणि संस्कारांचे शिक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
धर्म आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे : आमदार संग्राम जगताप
स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज समाजात अस्थिरता निर्माण होत असताना आध्यात्मिक विचारांची गरज आहे. हिंदू संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याबरोबरच समाजव्यवस्थेत संस्कार रुजविण्याचे काम झाले पाहिजे. रत्नागिरी येथे सूर्य मंदिरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न झाला असता स्वामीजींनी मध्यस्थी करून तो प्रयत्न थांबविला होता. त्यामुळे आपापसांतील हेवेदावे बाजूला ठेवून धर्म आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.


