
Rasta Roko Movement : राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University), राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पात कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे यांच्या हत्याप्रकरणी आज (ता.९) शिवसेना तसेच विविध आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत नगर–मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad highway) विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दीड तास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) केले. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
नक्की वाचा : महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला बेड्या; पाथर्डी पोलिसांची कारवाई
परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न
आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी दिड तास होऊन ही न आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व कामगार कल्याण अधिकारी डॉ. उगले यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलसचिवांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता यानंतर कुलसचिव राजेंद्र पाटील यांच्याच्यावतीने प्रतिनिधी स्वरूपात प्रशासनामार्फत सहाय्यक कुलसचिव पेंडभाजे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबीयांसह आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. निवेदन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित स्तरावर पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जबाबदार अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी (Rasta Roko Movement)
शिवसेना व विविध आंबेडकरी संघटनांनी दिलेल्या निवेदनात श्रीकांत दोंदे हत्याप्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच विद्यापीठाचे कुलसचिव व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. निवेदनात विद्यापीठ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दोंदे ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या परिसरात पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा, प्रकाशव्यवस्था व अन्य सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी होत नसल्याने सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प
यासोबतच सुरक्षा अधिकारी ते कुलसचिवांपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच श्रीकांत दोंदे हे कुटुंबातील प्रमुख कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच एका पात्र सदस्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठात कायमस्वरूपी नोकरी देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. दरम्यान, आंदोलनामुळे नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलन मागे घेतल्यानंतर विदयापीठ सुरक्षा रक्षक व राहुरी पोलिसांकडुन वाहतूक पूर्ववत करण्यात आली


