Pathardi Police : महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला बेड्या; पाथर्डी पोलिसांची कारवाई

ॲट्रॉसिटी कायद्यासह अन्य संबंधित कलमान्वये नोंदवला गुन्हा

0
Pathardi Police : महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला बेड्या; पाथर्डी पोलिसांची कारवाई
Pathardi Police : महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला बेड्या; पाथर्डी पोलिसांची कारवाई

Pathardi Police : पाथर्डी : श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अवमानकारक मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी (Accused) सूरज बाबासाहेब वांढेकर (रा. मोहोज, ता. पाथर्डी) याला पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) बुधवारी (ता.८) रात्री ताब्यात घेतले आहे. आज (ता. ९) त्याला न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावली असून या प्रकरणामुळे पाथर्डी शहरासह तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. 

नक्की वाचा : जलजीवन मिशनमध्ये अनियमितता; जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी निलंबित

पाथर्डी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा

विविध सामाजिक संघटना, शिवप्रेमी, आंबेडकरी अनुयायी व नागरिकांनी बुधवारी (ता. ८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पाथर्डी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढूला होता. मोर्चेकऱ्यांनी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना निवेदन देत महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पाथर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू करून तांत्रिक माहिती व अन्य पुराव्यांच्या आधारे मोहोज येथून सूरज वांढेकर याला ताब्यात घेतले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ॲट्रॉसिटी कायद्यासह अन्य संबंधित कलमान्वये नोंदवला गुन्हा (Pathardi Police)

चौकशीदरम्यान आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीची ओळख पटताच त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे,बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद संजय जाधव यांनी ही कारवाई केली.