
Representation to the Superintendent of Police : नगर : शहरातील बेशिस्त वाहतूक, अवजड वाहनांचा (Heavy vehicle) वाढता वावर, वाहनांमध्ये अनधिकृत बदल आणि गावठी कट्ट्यांतून होणारा गोळीबार (Firing) यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असताना निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी टँकरच्या धडकेत क्रिकेटपटू यश अविनाश जाधव याचा मृत्यू (Death) झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियम मोडणाऱ्यांसह अवजड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा, अशी आक्रमक मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
नक्की वाचा : गड-दुर्ग अभ्यासक आणि संस्थांसाठी ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार 2026’; नामनिर्देशनासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत
अवजड वाहनांची वर्दळ वाढली
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना याबाबत निवेदन देण्यात आले. शहराला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी केवळ सूचना देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागेल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. अहिल्यानगर शहरात अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून, वाहतूक कोंडी आणि नियमभंगामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. काही वाहनचालकांकडून विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, वाहतूक नियम धाब्यावर बसविणे असे प्रकार घडत आहेत. वाहनांमध्ये अनधिकृतरीत्या केले जाणारे मॉडिफिकेशनही रोखण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अवजड वाहनांच्या प्रवेशावर योग्य नियंत्रण ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कार्यकर्ते उपस्थित (Representation to the Superintendent of Police)
शहरात वाहतुकीचे नियम कागदावरच राहणार की प्रत्यक्ष रस्त्यावर शिस्त दिसणार, हा प्रश्न आता नागरिकांसमोर आहे. यश जाधवसारख्या तरुणाचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासनाने ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी महापौर ज्योती गाडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, दत्ता गाडळकर, सुजय मोहिते, करण कराळे, नगरसेविका गीतांजली काळे, अविनाश घुले, सुरेश बनसोडे, मनोज दुल्लम, सुनील त्रंबके, मयूर बांगरे, सुमित लोंढे, मोहित पंजाबी, माणिक विधाते, बाळासाहेब पवार, महेश लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यश जाधवचा बळी; प्रशासन आणखी किती मृत्यूंची वाट पाहणार?: करण कराळे
दोन दिवसांपूर्वी झालेल्या टँकरच्या अपघातात क्रिकेटपटू यश अविनाश जाधव याला जीव गमवावा लागला. टँकर विरुद्ध दिशेने येऊन धडकल्याने हा अपघात झाल्याचे करण कराळे यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरातील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक करण कराळे यांनी केली आहे.
गावठी कट्टे येतात कुठून? पुरवठ्याच्या मुळावर घाव घाला!: निखिल वारे
शहरात अनधिकृत शस्त्रांचा पुरवठा होत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. हल्ल्यांच्या घटना आणि अलीकडे गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे शस्त्र शहरात येतात कुठून, त्यांचा पुरवठा कोण करतो आणि त्यामागे कोणत्या टोळ्या आहेत, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. केवळ घटनांनंतर कारवाई करण्याऐवजी शस्त्रपुरवठ्याची साखळीच उद्ध्वस्त करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
सणासुदीत घरफोड्या रोखा; महाविद्यालय परिसरातही तपासणी करा
आगामी सणासुदीच्या काळात घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक निखिल वारे यांनी केली. महाविद्यालय परिसरातही पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तरांची, खिशांची तसेच वाहनांच्या डिक्कीची तपासणी करून अनधिकृत शस्त्रे किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पोलिसांकडून कारवाई सुरू
शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू केल्याचे सांगितले. संबंधित यंत्रणांना आवश्यक कारवाईच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


