Rohit Pawar | शेतकऱ्यांना मदतीच्या वेळी सरकार हात आखडता घेते; आमदार रोहित पवार आक्रमक

0

Rohit Pawar | नगर : कर्जत-जामखेड मतदारसंघात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत कर्जत तालुक्यात मंजूर झालेल्या चारा डेपोला विरोध केला जात असल्याचा आरोप करत, हा चारा डेपो लवकर सुरू झाला नाही तर मोठे आंदोलन उभारू, असा आक्रमक इशारा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी दिला. सरकार केवळ घोषणा करते; प्रत्यक्ष मदत देण्याची वेळ आली की हात आखडता घेते, अशी टीकाही त्यांनी केली.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या (S.T.) मुलांसाठी मोफत पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

चारा सुरू छावण्याची मागणी ( Rohit Pawar )

सुरत-चेन्नई महामार्गाच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज (ता. १९) आयोजित आढावा बैठकीसाठी आले असताना रोहित पवार यांनी विविध प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला. आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेडमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी होत आहे. मात्र, सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदतही अद्याप ६० टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सरकार बोलते मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाही, असा घणाघात पवार यांनी केला. जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच चारा छावण्या सुरू कराव्यात. अन्यथा सरकारविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राम शिंदेंवर आरोप ( Rohit Pawar )

ते पुढे म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघात सुमारे २८ हजार कांदा उत्पादक शेतकरी आहेत. सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच आपण संघर्ष करत असल्याचे सांगत, आगामी काळात दुष्काळाच्या प्रश्नावर मोठे आंदोलन उभारण्याचे संकेत त्यांनी दिले. जामखेड शहराच्या पाणीप्रश्नावर बोलताना रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जामखेडच्या पिण्याच्या पाण्यासाठी १६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, सत्ता बदलल्यानंतर ही योजना रखडली. काही लोक आमदार आणि सभापती झाले; मात्र जनतेच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. ही योजना वेळेत पूर्ण झाली असती तर आज जामखेडकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला नसता, असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली असून, पुढील दोन महिन्यांत ही योजना मार्गी लावावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सभापती राम शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. २०-२२ दिवस फिरायला जाता, मात्र त्याचा आपल्या मतदारसंघाला आणि राज्याला काय फायदा झाला, असा सवाल करत त्यांनी राम शिंदेंना टोला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here