Sangamner Municipal Council : संगमनेर पालिकेची मोठी कारवाई; धोकादायक बांधकाम पाडण्यास सुरुवात

प्राथमिक पाहणीतच हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि धोकादायक असल्याचे निष्पन्न

0
Sangamner Municipal Council : संगमनेर पालिकेची मोठी कारवाई; धोकादायक बांधकाम पाडण्यास सुरुवात!
Sangamner Municipal Council : संगमनेर पालिकेची मोठी कारवाई; धोकादायक बांधकाम पाडण्यास सुरुवात!

Sangamner Municipal Council : संगमनेर : नगरपालिका (Sangamner Municipal Council) प्रशासनाने सुकेवाडी रोड परिसरामध्ये सुरू असलेल्या अत्यंत धोकादायक बांधकामावर मोठी कारवाई केली आहे. येथील डॉ. अशोक इथापे यांच्या लेडीज हॉस्टेल इमारतीच्या धोकादायक बांधकामावर नगर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत ते पाडण्यास सुरुवात केली आहे. या धडक कारवाईमुळे शहरात अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे (Dayanand Gore) यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष नुरमहंमद शेख, आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे, नगरसेवक अमजद खान, श्रीपाद शाह यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नक्की वाचा : शाळेतील साहित्य चोरणारा जेरबंद; भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी

वादळी पावसामुळे उघडकीस आले निकृष्ट बांधकाम

सुकेवाडी रोड परिसरात डॉ. इथापे यांच्या लेडीज हॉस्टेल इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामध्ये तळमजला आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यावर पुढील मजल्यांचे काम सुरू होते. मात्र, शुक्रवार (ता. ५) परिसरामध्ये झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पॅरापिट वॉल (सुरक्षा भिंत) कोसळली. या भिंतीचे सिमेंटचे जड ठोकळे आणि विटा थेट शेजारील नागरिकांच्या घरांवर आणि अंगणात जाऊन पडल्या. यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि सिमेंटच्या पाण्याच्या टाक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, पाऊस सुरू असल्याने सर्व नागरिक घरातच होते. त्यामुळे कोणीही घराबाहेर नसल्याने एक मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी तात्काळ या घटनेचे फोटो आणि माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना फोनद्वारे दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न (Sangamner Municipal Council)

घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. प्राथमिक पाहणीतच हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. पॅरापिट वॉलच्या बांधकामात विटा आणि सिमेंट मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य योग्य प्रमाणात वापरले गेले नव्हते, तसेच बीमचे योग्य सपोर्टही दिसून आले नाहीत. या गंभीर निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट होताच, मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगरपालिकेने तात्काळ जेसीबी आणि मजुरांच्या साहाय्याने ते धोकादायक बांधकाम पाडण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू केली.

शहरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पावसाळा तोंडावर असल्याने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी संगमनेर शहरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. शहरात कुठेही जुन्या, मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक इमारती असतील, तसेच धोकादायक झाडे असतील, तर नगरपालिकेमार्फत संबंधितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून अशा धोकादायक इमारती किंवा त्यातील भाग काढून घ्यावेत, जेणेकरून स्वतःच्या आणि परिसरातून जाणाऱ्या इतर नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे आवाहन मुख्याधिकार्‍यांनी केले आहे.