Satyajit Tambe on Rail Minister Twit : नगर : वडापाव दिवसाच्या निमित्ताने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टला आमदार सत्यजित तांबे यांनी भन्नाट उत्तर दिले आहे. यामध्ये तांबे यांनी थेट संगमनेरच्या रेल्वेचा मुद्दा मांडत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, या मागणीला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे. अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत, ‘लसूण चटणी की तळलेली मिरची? वडा-पावसोबत तुमचा आवडता साथीदार कोणता?’ असा प्रश्न विचारला होता. या पोस्टवर अनेकांनी आपल्या आवडीच्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र, सत्यजित तांबे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना थेट संगमनेरच्या रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला.
संगमनेरमध्ये शिवाजी महाराज स्मारकावरून श्रेयवाद; सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खताळ संघर्षाची नवी ठिणगी
काय म्हणाले सत्यजित तांबे?
“लसूण चटणी किंवा तळलेली मिरची ? आम्हाला दोन्हीही चालतील सर… फक्त हा वडापाव पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेत खाण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठीच आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत.
आणि हो… काहींसाठी वडापाव ही मौजमजा असेल, पण रेल्वेच्या अभावामुळे घरापासून लांब राहणाऱ्या अनेक तरुणांसाठी हीच उपजीविका आहे. पुणे – नाशिक सरळमार्गे रेल्वे झाल्यास हेच तरुण वेळेत घरी पोहोचून आईच्या हातचे जेवण जेवू शकतील!”
रेल्वेच्या मागणीला थेट ‘एक्स’वर वाचा (Satyajit Tambe on Rail Minister Twit)
सत्यजित तांबे यांनी वडापावच्या चटणी-मिरचीच्या चर्चेतून तांबे यांनी थेट रेल्वेचा मुद्दा रेल्वेमंत्र्यांसमोर आणला. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला तांबे यांनी थेट ‘एक्स’वर वाचा फोडली आहे. संगमनेरला या रेल्वे मार्गाशी जोडल्यास स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो, असा आशय यामागे आहे.
पहा : खासदार निलेश लंके यांनी केली शनिमंदिरात स्वछता
विशेष म्हणजे, रेल्वेमंत्र्यांनी वडापावसोबतच्या आवडत्या साथीदाराबाबत विचारलेल्या हलक्याफुलक्या प्रश्नाला तांबे यांनी स्थानिक विकास आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या गंभीर प्रश्नाशी जोडले. त्यामुळे त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहे. वडापावसोबत चटणी की मिरची? या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी तांबे यांनी थेट ‘संगमनेरमार्गे रेल्वे’चा मुद्दा मांडल्याने आता रेल्वेमंत्री या मागणीची दखल घेतात का? याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.



