Satyajit Tambe vs. Amol Khatal : संगमनेरमध्ये शिवाजी महाराज स्मारकावरून श्रेयवाद; सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खताळ संघर्षाची नवी ठिणगी

0
Satyajit Tamba vs. Amol Khatal : संगमनेरमध्ये शिवाजी महाराज स्मारकावरून श्रेयवाद; सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खताळ संघर्षाची नवी ठिणगी
Satyajit Tamba vs. Amol Khatal : संगमनेरमध्ये शिवाजी महाराज स्मारकावरून श्रेयवाद; सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खताळ संघर्षाची नवी ठिणगी

Satyajit Tambe vs. Amol Khatal : नगर : संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामावरून आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्यात राजकीय श्रेयवाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासारख्या भावनिक आणि ऐतिहासिक विषयाचे श्रेय नेमके कुणाला मिळणार? यावरून दोन्ही गटांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाल्याने संगमनेरच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. स्मारकाच्या कामासाठी निधी, पाठपुरावा आणि प्रशासनाकडे केलेल्या मागण्या याबाबत दोन्ही बाजूंकडून आपापल्या भूमिकेचे समर्थन केले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामापेक्षा हे काम कुणाच्या प्रयत्नातून पुढे आले? हा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील ५४ स्टोन क्रशर सील; गौण खनिज माफियांना दणका!

नेमकं प्रकरण काय?

२०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या काळात नगरपालिकेत शिवस्मारकाचा ठराव झाला होता. २०२३ मध्ये सत्यजित तांबे यांनी सरकारकडे पाठपुरावा करून बसस्थानक परिसरात जागा मिळवण्याची मागणी केली. ऑगस्ट २०२६ मध्ये एसटी महामंडळ आणि नगरपालिकेदरम्यान जागा हस्तांतरणाचा करार झाला असून, तांबे गटाने याला आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यश म्हटले आहे. तर दुसरीकडे, आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांकडूनही स्मारकासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि पाठपुराव्याचा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे एका विकासकामाभोवती दोन राजकीय दावेदार उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

स्मारकाला राजकीय रंग? (Satyajit Tambe vs. Amol Khatal)

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि प्रेरणेचे केंद्र आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मारकाशी संबंधित कोणतेही काम राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरते. नगरपालिका निवडणुकीतही दोन्ही गटांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. या स्मारकाच्या जागेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार अमोल खताळ एकत्र आले होते. मात्र याच स्मारकावरून आता श्रेवादाची लढाई रंगल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नक्की पहा : आमदार जगताप यांनी सांगितले सकल हिंदू समाजाचे उपोषण स्थगित करण्यामागचे कारण

आगामी राजकारणासाठी संकेत? (Satyajit Tambe vs. Amol Khatal)

संगमनेरच्या राजकारणात सध्या दोन्ही आमदार आपापला प्रभाव मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एखाद्या विकासकामाचे उद्घाटन, निधी मंजुरी किंवा प्रशासनाकडील निर्णय यामागे कोणाचा पुढाकार होता, यावरून भविष्यातही श्रेयवादाची राजकीय लढाई रंगण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, स्मारकाचा विषय हा केवळ विकासकामाचा नसून भावनिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या श्रेयवादातून दोन्ही नेत्यांमधील राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होणार का, याकडे संगमनेरचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.

अखेर स्मारक कुणाच्या श्रेयातून उभे राहिले यापेक्षा ते भव्य, दर्जेदार आणि शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसे व्हावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, सध्याच्या राजकीय वातावरणात स्मारक कुणाचे?’ यापेक्षा ‘श्रेय कुणाचे?’ हा प्रश्नच अधिक गाजताना दिसत आहे.