
खासगी रुग्णालयात उपचार सुरू; वन विभागाबद्दल नाराजी
Saved daughter by fighting off a leopard : संगमनेर : पोटच्या चिमुरडीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी एका बापाने स्वतःच्या प्राणाची बाजी लावल्याची (Saved daughter by fighting off a leopard) अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांनी वन विभागाबद्दल (Forest Department) मोठी नाराजी व्यक्त केली आहे. अवनी मनोज गुंजाळ असे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard attack) जखमी झालेल्या चार वर्षीय मुलीचे नाव आहे. तर विहिरीत पडून तिचे वडील मनोज गुंजाळ हे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नक्की वाचा : पवनराजे हत्याकांडात अण्णा हजारेंची साक्ष, कसा आला संबंध, हजारेंनी काय सांगितलं?
मुलीला ओढून नेताना पाहून पित्याने थेट बिबट्याशी केले दोन हात
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी (दि.२०) रात्री ८:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आपल्या ४ वर्षांच्या मुलीला बिबट्या ओढून नेताना पाहून पित्याने बिबट्याशी थेट दोन हात केले आणि मुलीची सुटका केली. मात्र, बिबट्याच्या तावडीतून सुटून धावताना अंधारात बाप-लेक दोघेही एका खोल विहिरीत कोसळले. या भीषण थरारात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मोठ्या धैर्याने बिबट्याशी मुकाबला (Saved daughter by fighting off a leopard)
डोंगरगाव येथील रहिवासी मनोज गुंजाळ यांची चार वर्षांची मुलगी अवनी ही तिच्या आईच्या पाठीवर होती, याच वेळी त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अवनीवर झडप घातली. बिबट्याने अवनीला तोंडात पकडले आणि तो तिला अंधाराच्या दिशेने काही अंतरापर्यंत ओढत नेऊ लागला. अवनीच्या आईने आरडाओरडा करताच जवळच असलेले तिचे वडील मनोज गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. आपल्या डोळ्यांदेखत पोटच्या मुलीला बिबट्या ओढून नेतोय हे पाहून मनोज गुंजाळ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बिबट्यावर थेट हल्ला चढवला. त्यांनी मोठ्या धैर्याने बिबट्याशी मुकाबला करत त्याच्या तावडीतून चिमुरड्या अवनीला सोडवून घेतले. बिबट्याच्या तावडीतून अवनीला सोडवल्यानंतर, मनोज हे तिला कडेवर घेऊन जीव वाचवण्यासाठी घराच्या दिशेने पळत सुटले. परंतु, रात्रीची वेळ आणि दाट अंधार असल्यामुळे त्यांना समोर असलेल्या विहिरीचा अंदाज आला नाही. पळण्याच्या वेगात मनोज गुंजाळ हे मुलीसह थेट खोल विहिरीत कोसळले.
दोघे विहिरीत पडल्याचा आवाज आणि कुटुंबाचा आक्रोश ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ तातडीने घटनास्थळाकडे धावले. ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने विहिरीतून वडील आणि मुलीला बाहेर काढले. बिबट्याच्या हल्ल्यात अवनी गंभीर जखमी झाली असून, विहिरीत पडल्यामुळे मनोज गुंजाळ यांनाही मोठी दुखापत झाली आहे. दोघांनाही तातडीने संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील कोतूळ येथील वाघापूर याठिकाणी असलेली अनिता सचिन रक्ते (वय 40) यांचेवर देखील दोन दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता या आल्यात महिलेच्या हाताला बिबट्याने पकडले होते त्या दुसऱ्या हाताला पंजा मारला होता. सदर महिलेला उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


