
Service Pledge Campaign : नगर : नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विविध शासकीय (Government) सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सेवा संकल्प अभियानाच्या (Service Pledge Campaign) माध्यमातून नाशिक विभागाने तयारी केली असल्याची माहिती प्रभारी विभागीय आयुक्त तथा नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी दिली. सर्व जिल्ह्यांनी विविध प्रशासकीय विभागाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी करावी आणि त्याला व्यापक प्रमाणात सर्वसामान्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नक्की वाचा : विक्रम पाचपुतेंचा रोहित पवारांवर पुन्हा निशाणा, दुखऱ्या नसेवर ठेवले बोट
विविध विभागांचे प्रमुख उपस्थित
आयुष प्रसाद यांनी आज सेवा संकल्प अभियान अंमलबजावणी आणि त्यासंदर्भात सर्व जिल्ह्यांनी केलेले नियोजन यासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, पाचही जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर अपर आयुक्त जितेंद्र वाघ, अपर आयुक्त अरविंद लोखंडे, सहायक आयुक्त विठ्ठल सोनवणे, क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश देशमाने यांच्यासह विभागीय आयुक्तालयातील विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाच जिल्ह्यांच्या नियोजनाचा आढावा (Service Pledge Campaign)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त तसेच सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ जलदगतीने पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांच्या नियोजनाचा आढावा प्र. विभागीय आयुक्त प्रसाद यांनी घेतला.
तालुकास्तरावर सेवा सेतू अभियान अंतर्गत शिबिरे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे आयोजित करून शासनाच्या विविध सेवांचे लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यात यावेत. राज्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यवसायिक व कॉर्पोरेट इनोव्हेटर्स व ग्रामीण भागातील नविन समाधाने (Solutions) विकसित करणाऱ्या लोकांना जोडण्यासाठी राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात यावे.
चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
सेवा माझे योगदान या उपक्रमाचे प्रत्येक गावात / वार्डात आयोजन करण्यात यावे. याअंतर्गत लोकसहभागून रक्तदान, स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी मोहीम आदी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रेचे आयोजन करण्यात यावे. शासकीय व खाजगी शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. सर्व अंगणवाड्यांच्या पातळीवर अंगणवाडी उत्सवाचे आयोजन करण्यात यावे. याशिवाय आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पाची रांगोळी, नमो सेवागाथा, जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ या कार्यक्रमांच्या आयोजनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षित
प्रत्येक जिल्ह्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. एका जिल्ह्यातील चांगल्या उपक्रमांची विभागातील इतर जिल्ह्यांनीही अंमलबजावणी करावी. थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत जाईल यादृष्टीने नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षित आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या अभियानातील उद्दिष्टपूर्तीपेक्षा अधिक चांगले योगदान प्रत्येक जिल्ह्याचे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात शासन निर्णयातील नमूद बाबीवर अधिक भर देऊन त्याप्रमाणे कार्यवाहीच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सेवा संकल्प अभियानाचे नियोजन सांगितले तर सदस्य सचिव तथा माहिती उपसंचालक डॉ. मोघे यांनी, या अभियानातील राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींची माहिती, फोटो, रील्स ही प्रसिद्धीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर संबंधित जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.


