Vikram Pachpute : नगर : भापजचे (BJP) श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केल्याने पाचपुते यांनी पवार यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे. तसंच आजोबांचे मार्गदर्शन घेऊन दृष्टीकोन बदलण्याचा सल्लाही दिला आहे.
नक्की वाचा : एसएस रिटेलचा आयपीओ खुला, अँकर इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद; १४६ कोटींची गुंतवणूक
पवार यांची एक्सवर पोस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मित्राचा प्रश्न मोदींना भेटल्यानंतर सुटला आहे. या घटनेचा संदर्भ एमपीएससी विरुद्धच्या आंदोलनाशी जोडत पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यातून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार यांनी म्हटले आहे की, १५ वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवले, पोलीस आणि न्यायालयांच्या फेऱ्या मारल्या, तरीही न्याय न मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्राने मोदींची भेट घेताच त्यांच्या जागेवर भाजप आमदाराने मारलेला ताबा लगेच सोडला. १५-१५ वर्षे न्याय मिळत नसेल आणि मित्राला एका भेटीत न्याय मिळत असेल, तर या देशात सामान्य नागरिकांसाठी न्यायाचा मार्ग न्यायालय आहे की मैत्री? असा प्रश्न पडतो.
एका भेटीत मोदींच्या मित्राला न्याय मिळतो, फडणवीस साहेबांचा केवळ मित्र आहे म्हणून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला MPSC अध्यक्षपदावरून हटवलं जात नाही. मग ‘मैत्री’ हाच भाजप राज्यात न्याय मिळण्यासाठीचा निकष असेल, तर भाजपने आता ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेखाली ‘ओळख असेल तरच न्याय’ अशी तळटीप द्यायला हरकत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पवार यांना उत्तर देण्यासाठी पाचपुते पुढे (Vikram Pachpute)
यावर आमदार पाचपुते यांनीही एक्सवर पोस्ट लिहून उत्तर दिले आहे. त्यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हटले आहे की, केवळ १२०० मतांनी विजय मिळाल्याची वेदना अजूनही संपलेली दिसत नाही. पण वेदनेला अंत नसतो. असो. २०२९ मध्ये कदाचित ती वेदनाही संपेल. कितीही थयथयाट केला, तरी अशा प्रकारच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कुणी मोठं झालेलं नाही आणि भविष्यातही होऊ शकत नाही. त्यापेक्षा आपल्या आजोबांचं मार्गदर्शन घ्या; कदाचित त्यातून राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला, तर काही फरक पडू शकेल, असे पाचपुते यांनी म्हटले आहे. गेल्या काही काळापासून आमदार पवार यांना उत्तर देण्यासाठी आमदार पाचपुते पुढे आल्याचे दिसून येते. एमपीएससी आंदोलनाच्या निमित्ताने यापूर्वीही पाचपुते यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.



