Shani Shingnapur : शनिदेवाच्या अभिषेकासाठी बनावट तेल?शनिशिंगणापूरमध्ये खळबळ; भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप, चौकशीची मागणी

Shani Shingnapur : शनिदेवाच्या अभिषेकासाठी बनावट तेल?शनिशिंगणापूरमध्ये खळबळ; भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप, चौकशीची मागणी

0
Shani Shingnapur : शनिदेवाच्या अभिषेकासाठी बनावट तेल?शनिशिंगणापूरमध्ये खळबळ; भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप, चौकशीची मागणी
Shani Shingnapur : शनिदेवाच्या अभिषेकासाठी बनावट तेल?शनिशिंगणापूरमध्ये खळबळ; भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप, चौकशीची मागणी

Shani Shingnapur : अहिल्यानगर : देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या मूर्तीवर अभिषेकासाठी विकल्या जाणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिचौथऱ्यावर वाहण्यासाठी काही ठिकाणी भेसळयुक्त अथवा निकृष्ट तेलाची विक्री होत असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रीराम संघाने (Rashtriya Shriram Sangh) केला आहे. या प्रकारामुळे शनिशिंगणापूरच्या (Shani Shingnapur) पवित्र परिसरात एकच खळबळ उडाली असून, भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय श्रीराम संघाचे अमोल वांढेकर, लखन ढगे, अर्जुन महाले आणि संतोष डांगे यांनी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांची भेट घेत निवेदन दिले. दररोज हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी शनिशिंगणापूरला येतात. शनिमूर्तीवर तेल वाहण्याची परंपरा असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने तेल खरेदी करतात. याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन जर भेसळयुक्त तेल विकले जात असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

मोठ्या रॅकेटची शक्यता; सखोल चौकशीची मागणी

या प्रकरणामागे केवळ एखाद्या विक्रेत्याचा प्रकार नसून मोठे रॅकेट असण्याची शक्यता अमोल वांढेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तेल विक्री करणाऱ्या दुकानांपुरती चौकशी मर्यादित न ठेवता तेलाचा पुरवठा कुठून होतो, कोणत्या ठिकाणी त्याची खरेदी होते आणि विक्रीपूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक नको (Shani Shingnapur)

भाविकांच्या श्रद्धेशी कोणालाही खेळू दिला जाऊ नये. निकृष्ट अथवा बनावट तेलाची विक्री होत असल्याचे तपासणीत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि अशा विक्रेत्यांची दुकानदारी बंद करावी, अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाने केली आहे. मंदिर परिसरात विक्री होणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेबाबत देवस्थान प्रशासनाने यापूर्वीच अन्न व औषध प्रशासनाला कळविले असून, तेलाचे नमुने घेऊन गुणवत्ता तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या तपासणीत तेलाची गुणवत्ता नेमकी कशी आहे, आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि या प्रकरणामागे खरोखरच मोठे रॅकेट आहे का, याचा उलगडा होणार आहे.शनिदेवाच्या चरणी वाहिले जाणारे तेलही भेसळमुक्त असावे, अशी भाविकांची अपेक्षा असताना आता प्रशासन या आरोपांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवस्थान प्रशासन म्हणते, तपासणीत चुकीचे आढळल्यास कारवाई करू
शनिशिंगणापूर देवस्थानचे प्रशासक अतुल चोरमारे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी देवस्थान प्रशासनाकडे एक निवेदन प्राप्त झाले असून, त्यामध्ये शनिदेवाच्या अभिषेकासाठी विकल्या जाणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेबाबत तसेच बनावट तेल विक्रीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीही सन २०२५ मध्ये अशाच स्वरूपाचा प्रकार देवस्थानच्या निदर्शनास आला होता. त्याच पार्श्वभूमीवर सध्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, देवस्थान प्रशासनाच्या वतीने याबाबत अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात आले आहे. संबंधित तेलाची योग्य ती तपासणी करण्यात येईल. तपासणीत तेलाच्या गुणवत्तेबाबत काही चुकीचे आढळून आल्यास संबंधित प्रकार तातडीने बंद करण्यात येईल, अशी भूमिका देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केली आहे.