SIR : पाथर्डी : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची (Shevgaon-Pathardi Assembly Constituency) प्रारूप मतदार यादी (Voter List) प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारसंघात एकूण ३ लाख ७६ हजार ८४९ मतदार असून, मयत, अनुपस्थित, कायमस्वरूपी स्थलांतरित, स्थलांतरित तसेच दुबार नोंदी आदी विविध कारणांमुळे प्रारूप यादीच्या प्रक्रियेत ४१ हजार २९३ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
नक्की वाचा : भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; मंत्री विखे पाटलांचे आश्वासन पूर्णत्वाकडे
३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाची तसेच मतदार यादीतील नोंदींची तपासणी करून दावे व हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.मतदार यादीत नवीन नाव नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक ६, नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७, तर नाव, पत्ता अथवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती तसेच स्थलांतरासाठी फॉर्म क्रमांक ८ भरावा लागणार आहे. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ ) यांच्याकडे अर्ज सादर करावा.प्राप्त दावे व हरकतींची सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियमानुसार छाननी करणार असून, २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्यावर कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रशासनाने स्पष्ट केले की (SIR)
मतदारांनी प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, तसेच नाव, पत्ता व इतर तपशील अचूक आहेत किंवा नाहीत, याची खात्री करावी. पात्र मतदाराचे नाव वगळले असल्यास किंवा मतदार यादीतील नोंदीबाबत हरकत असल्यास विहित मुदतीत दावे-हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार आकाश दहाडदे यांनी केले आहे. मतदारांनी बीएलओ’शी संपर्क साधावा प्रारूप मतदार यादीतील नावाची खात्री करण्यासाठी मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ)यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



