
Snehalaya : पारनेर : गेल्या चोवीस तासात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून समोर आलेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्हेगारी (Crime) घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीपासून ते संपूर्ण कुटुंबाच्या हत्येपर्यंतच्या या घटनांनी समाजातील वाढती विकृती आणि असुरक्षितता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. या अमानवी कृत्यांचा ‘स्नेहालय’ (Snehalaya) संस्थेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, या विकृतीविरोधात आता व्यापक जनआंदोलन (Movement) छेडण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
नक्की वाचा : कर्जत पोलीस उपविभागात अत्याधुनिक तपास यंत्रणेसह अत्याधुनिक वाहन दाखल
सामाजिक स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण
पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. ही घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये एका १६ वर्षीय मुलाने ३ वर्षांच्या बालकावर अत्याचार करून त्याचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात आईसह दोन निष्पाप मुलांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनांच्या साखळीने सामाजिक स्वास्थ्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास होणे गरजेचे (Snehalaya)
या संवेदनशील विषयावर भाष्य करताना स्नेहालय संस्थेने म्हटले आहे की, “या घटना केवळ गुन्हे नसून समाजाच्या संवेदना गोठवणाऱ्या आहेत.” संस्थेच्या ‘बाल स्नेह आधार’ आणि ‘मुक्ती वाहिनी’ या प्रकल्पांच्या माध्यमातून या संदर्भात राज्यभर व्यापक जनजागरण केले जाणार आहे. केवळ कायदेशीर कारवाई करून ही विकृती थांबणार नाही, तर गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यासाठी स्नेहालयच्या मानसग्राम प्रकल्पांतर्गत पुढील दोन आठवडे ‘वाढती मनोविकृती आणि सामाजिक उपाय’ या विषयावर विशेष अभियान राबवले जाणार आहे.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे
लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पालकांचे प्रबोधन आणि तरुणांमधील विकृत मानसिकतेवर उपचार यावर या मोहिमेत भर दिला जाईल. समाजातील प्रत्येक घटकाने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे. स्नेहालयच्या या जनजागृती अभियानात आणि मुक्ती वाहिनीच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी ९०११०२६४९५, ७७७००२७५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘टीम स्नेहालय’ कडून करण्यात आले आहे. वेळ आली आहे आता शांत बसण्याची नाही, तर आपल्या आसपास वावरणाऱ्या अशा विकृतींना ठेचून काढण्यासाठी संघटित होण्याची.


