Snehalaya : मलाला युसुफझाईच्या प्रेरणेतून स्नेहालयाचा अभिनव उपक्रम; निघोजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

युसुफझाई यांचा संघर्ष जगातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी

0
Snehalaya : मलाला युसुफझाईच्या प्रेरणेतून स्नेहालयाचा अभिनव उपक्रम; निघोजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
Snehalaya : मलाला युसुफझाईच्या प्रेरणेतून स्नेहालयाचा अभिनव उपक्रम; निघोजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Snehalaya : पारनेर : नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) प्राप्त मलाला युसुफझाई (Malala Yousafzai) यांच्या कार्यातून प्रेरणा घेत स्नेहालय संस्था मागील दहा वर्षांपासून मुलींचे शिक्षण, सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांविषयी सातत्याने जनजागृती करत आहे. यंदाही मलाला यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालय संचलित ‘उडान’ प्रकल्प, ‘मुक्ती वाहिनी’, बालभवन, स्नेहालय (Snehalaya) पुनर्वसन संकुल आणि रेडिओनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील निघोज येथे विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नक्की वाचा : कर्जतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप एकत्र; नगराध्यक्षपदी छाया शेलार विराजमान

कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जाणार

११ जुलै रोजी श्री मुलिकादेवी विद्यामंदिर, निघोज येथे बालविवाह प्रतिबंध, मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या हक्कांबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भव्य जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये केवळ घोषणाबाजी न करता पथनाट्य, नाटिका, नृत्याविष्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जाणार आहे. नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई हिने मुलींच्या शिक्षणासाठी दिलेला संघर्ष आज जगभरातील लाखो मुलींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. तिच्या विचारांपासून प्रेरणा घेत स्नेहालयच्या विविध प्रकल्पांमार्फत नगर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि गावांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण, बालविवाह प्रतिबंध, शिक्षणाचे महत्त्व आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

युसुफझाई यांचा संघर्ष जगातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी (Snehalaya)

दरवर्षी स्नेहालय पुनर्वसन संकुलात “शिका, सक्षम व्हा, नेतृत्व करा” या संकल्पनेवर आधारित विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये बेस्ट स्टोरी, बेस्ट ॲक्टिव्हिटी, बेस्ट फोटो, बेस्ट व्हिडिओ, केक डेकोरेशन, विविध क्रीडा स्पर्धा तसेच बेस्ट सपोर्ट टीचर अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी ‘शिक्षणदूत’ म्हणून आपल्या परिसरात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करतात. या उपक्रमाविषयी माहिती देताना ‘उडान’ प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम म्हणाले, “मलाला युसुफझाई यांचा संघर्ष जगातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ग्रामीण भागात मुलींच्या हक्कांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि शिक्षणाची प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

या कार्यक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार

या जनजागृती मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (निघोज विभाग), निघोज ग्रामपंचायत आणि श्री मुलिकादेवी विद्यामंदिर, निघोज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच, १२ जुलै रोजी मलाला युसुफझाई यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालय एमआयडीसी येथे मुला-मुलींसाठी क्रिकेट, बास्केटबॉल, पोस्टर निर्मिती, चित्रकला, केक डेकोरेशन तसेच विविध सर्जनशील आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीवा विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक ठरणार

आजही ग्रामीण भागात कौटुंबिक दबाव, सामाजिक रूढी आणि शिक्षणाच्या अभावामुळे अनेक मुलींना अल्पवयातच संसाराची जबाबदारी स्वीकारावी लागते. अशा परिस्थितीत मुलींना शिक्षणाची संधी, समान हक्क आणि सुरक्षित भविष्य मिळावे, हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी स्नेहालयचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.निघोज परिसरातील नागरिकांनी, विशेषतः पालकांनी, या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन बालविवाहमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आपला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन स्नेहालयच्या वतीने करण्यात आले आहे. “मुलगी शिकली, प्रगती झाली” या विचाराचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.