Solar Project : संगमनेर : तालुक्यातील कौठेमलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या (Solar Project) कामाला विरोध दर्शविण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले (Gulabraj Bhosale) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १९) आंदोलन (movement) करण्यात आले. या आंदोलनाला शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवत सौर प्रकल्पाचे काम तातडीने बंद करून त्याचे साहित्य प्रस्तावित जागेतून हटविण्याची मागणी केली.
नक्की वाचा : शनिवारी नगरमध्ये महारक्तदान शिबिर; अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा उपक्रम, 7,500 पिशव्या संकलनाचे उद्दिष्ट

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
साकूर पठार भागातील हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कौठेमलकापूर येथे शेकडो हेक्टर जागेवर औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून हा प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित केलेल्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रकल्पामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप (Solar Project)
ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, सरपंच रविंद्र दातीर, रणजित ढेरंगे, सोमनाथ बारवे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि असंख्य ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. सौर प्रकल्पाचा कोणताही कर्मचारी आंदोलनस्थळी उपस्थित नसल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले. प्रस्तावित जागेवरून सौर प्रकल्पाचे सर्व साहित्य तातडीने हटवावे आणि प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.आंदोलनादरम्यान विविध वक्त्यांनी आक्रमक भाषणे करत, औद्योगिक वसाहत होऊ नये म्हणूनच या ठिकाणी सौर प्रकल्प आणण्यात आला आहे का, असा सवाल उपस्थित केला. तसेच या प्रकल्पामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही काही आंदोलकांनी केला.
मागणीवर आंदोलक ठाम
दरम्यान, दोन दिवसांच्या आत सौर प्रकल्पाचे साहित्य प्रस्तावित जागेतून हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गुलाबराजे भोसले यांनी दिला. यावेळी त्यांनी संतप्त भाषण करत जाळपोळीचा इशाराही दिला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आंदोलकांनी नायब तहसीलदार गणेश आढारी यांना निवेदन दिले. यावेळी सौर प्रकल्पाचे काम सद्यस्थितीत स्थगित करण्यात आल्याची माहिती आढारी यांनी आंदोलकांना दिली. मात्र, केवळ काम स्थगित करून चालणार नाही, तर सौर प्रकल्पाचे साहित्यही प्रस्तावित जागेतून तातडीने हटवावे, या मागणीवर आंदोलक ठाम राहिले.
आंदोलकांना घेतले ताब्यात
यानंतर आंदोलकांनी थेट सौर प्रकल्पाच्या मशिनरी व इतर साहित्याच्या दिशेने मोर्चा वळविला. परिस्थितीला वेगळे वळण लागू नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्यासह रणजित ढेरंगे, सरपंच रविंद्र दातीर, सोमनाथ बारवे यांच्यासह सुमारे १० ते १२ आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना नोटीस देऊन सोडून दिले.



