
Solar System : नगर : केंद्र सरकारच्या (Central Government) महत्वाकांक्षी असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत महावितरणच्या अहिल्यानगर मंडळातील २१ हजार ६५८ ग्राहकांनी सौर यंत्रणा (Solar System) आपल्या छतावर बसवून पारंपारीक विजेवरील अवलंबित्व कमी करत स्वतःच वीज निर्माते बनत ७२.६५ मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती सुरू केली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या (PM Surya Ghar Yojana) अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे जनजागृती करण्यात येत असून या योजनेचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या अहिल्यानगर मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी केले आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
२१ हजार ६५८ ग्राहकांची सौर यंत्रणा स्थापित
महिनाभरात तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महावितरण अहिल्यानगर मंडळ अंतर्गत अहिल्यानगर ग्रामीण विभागात एकूण २ हजार २३४ ग्राहक, अहिल्यानगर शहर विभागात ९ हजार ९६५ ग्राहक, कर्जत विभागात ५५६ ग्राहक, संगमनेर विभागात ४ हजार ९६६ ग्राहक तर श्रीरामपूर विभागात ३ हजार ९३७ अशा एकूण २१ हजार ६५८ ग्राहकांची सौर यंत्रणा स्थापित झाली आहे त्यातून एकूण ७२.६५ मेगावॅट विजेची निर्मिती क्षमता आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एक किलोवॅट प्रकल्पातून महिन्याला १२० युनिट वीजनिर्मिती (Solar System)
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते.
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते याशिवाय, सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. रूफ टॉप सोलर उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटर सुद्धा मोफत लावण्यात येत असून त्याचप्रमाणे १० किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज सुद्धा उपलब्ध आहे.
वीजग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे तसेच नोंदणी करण्यासाठी पीएम सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल अँप उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा आणि ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.


