ST Bus : नगर : राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. यंदा राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी तब्बल ५,५०० विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा : नवनिर्वाचित विधान परिषद आमदार प्राजक्त तनपुरेंनी सांगितला पावसाचा ‘खास योगायोग’
जाणून घ्या सवलती
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी सवलत ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. महिलांसाठी ५०% सवलत ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिला प्रवाशांना नेहमीप्रमाणे तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. पंढरपूरमध्ये विशेष सुविधा वारीच्या काळातील प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर परिसरात तात्पुरते बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. तसेच पिण्याचे पाणी, शौचालये, आरोग्य सुविधा, माहिती केंद्र आणि दिशादर्शक फलकांची व्यवस्था केली जाणार आहे.’
नक्की पहा : पैगंबरांबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या भाजपच्या महिला नेत्याच्या प्रतिमेचे दहन
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाय (ST Bus)
आषाढी एकादशीच्या काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एसटी प्रशासन आणि पोलिस विभाग संयुक्तपणे काम करणार आहेत. वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक आणि अधिकारी २४ तास सेवेत राहणार आहेत. वारकऱ्यांना प्रवास सुरक्षित, सुलभ आणि वेळेत होण्यासाठीआपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



