
State-level Boxing Competition : नगर: द बिशॉप्स स्कूल, कल्याणी नगर, पुणे येथे पार पडलेल्या आयसीएसई झोनल आणि स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत (State-level Boxing Competition) कर्नल परब्स् स्कूल (Colonel Parb’s School), अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत ८ सुवर्णपदके, १ रौप्यपदक आणि २ कांस्यपदके पटकावली. राज्यभरातील बलाढ्य स्पर्धकांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विद्यार्थ्यांनी शाळेचा तसेच अहिल्यानगरचा नावलौकिक उंचावला.
या विद्यार्थ्यांनी मिळवली पदके
स्पर्धेत श्रीराज सुरवसे, वेदांत बडे, सिया आडसुरे, आराध्या खंडेलवाल, अनय परदेशी, प्रद्युमन शेळके, ईश्वरी जाधव आणि काव्या खिळे यांनी सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. शेख अल हमजा याने रौप्यपदकाची कमाई केली, तर वरद गावडे, अलिना पठाण यांनी कांस्यपदक पटकावत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड (State-level Boxing Competition)
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे सर्व सुवर्णपदक विजेते विद्यार्थी तसेच अर्णव निकरड यांची आगामी राष्ट्रीय आयसीएसई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी, पालक आणि शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दैदिप्यमान यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत, नियमित सराव, शिस्त, जिद्द आणि जिंकण्याची जिद्द कारणीभूत ठरली. शाळेचे संचालक कर्नल दिलीप परब आणि संचालक श्री. रिकीराज परब यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध झाले.
विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक श्री. उस्मान शेख यांचे सातत्यपूर्ण, तांत्रिक आणि दर्जेदार मार्गदर्शन लाभले. तसेच या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यालयाच्या संस्थापिका गिता परब, प्राचार्या कु. अर्पिता रणनवरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पदक विजेते विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. राष्ट्रीय स्पर्धेतही विद्यार्थी यशाची ही सुवर्णपरंपरा कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कर्नल परब्स् स्कूलमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या विद्यालयाने अल्पावधीतच राज्यस्तरावर आपला ठसा उमटविला असून, या ऐतिहासिक यशामुळे कर्नल परब्स् स्कूलच्या क्रीडा परंपरेत आणखी एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली आहे.


