
State Teacher Merit Award : अहिल्यानगर: ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चार उपक्रमशील शिक्षकांना राज्य शासनाचा (State Teacher Merit Award) प्रतिष्ठेचा ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ (Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Merit Award) जाहीर झाला आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या या पुरस्कारांची घोषणा राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २७) केली. या निवडीनंतर जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळातून या शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे विशेष कार्य:
- नीलम आप्पासाहेब सुंबे (ता. पारनेर): भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या सुंबे यांनी ‘शिष्यवृत्ती मिशन आरंभ’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला. या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण करून त्यांना यशाच्या वाटेवर नेले.
- श्रीनिवास भूमराज एल्लाराम (ता. पाथर्डी): मांडवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक एल्लाराम यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम केला.
- दत्तात्रय अंगद घवले (ता. राहाता): कोल्हार बुद्रुक येथील सहायक शिक्षक घवले यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.
- मारुती रामजी बांडे (ता. अकोले): दुर्गम आणि आदिवासी क्षेत्रात शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी बांडे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अकोले तालुक्यातील पाचनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ग्रामीण शिक्षणाचा उंचावला दर्जा: (State Teacher Merit Award)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी या चारही शिक्षकांनी सातत्याने विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने घेतली असून, या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळाली आहे.


