
Sugarcane price : नगर : ऊसदराचा (Sugarcane price) प्रश्न आता चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, या भूमिकेवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) ठाम असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ३७०० रुपये द्यावी, अशी त्यांनी आक्रमक मागणी केली आहे. याशिवाय ऊसतोडीनंतर १०० रुपये आणि साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर आणखी २०० रुपये द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. चर्चेतून मार्ग निघाला नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उद्या (ता. 28)पासून आंदोलन छेडणारच, असा स्पष्ट इशारा शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान कारखानदारांची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावर काय तोडगा निघतो याकडे आता लक्ष लागले आहे.
ऊसदराच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली. त्यामुळे ऊसदराचा तिढा अद्याप कायम आहे. या बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे, अभिजित पोटे, तोरडकर तात्या यांच्यासह शेतकरी आणि कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : शिर्डी येथील उपविभागीय कार्यालयात संलग्न असलेला हवालदार एसीबीच्या जाळ्यात
नगर जिल्ह्याची साखर उतारा क्षमता सोलापूरपेक्षा अधिक
शेजारच्या जिल्ह्यांमध्ये ३५०० ते ३९०० रुपये पहिली उचल दिली जात आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात ४२०० रुपये ऊसदर मिळत आहे. मग नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी दर का स्वीकारायचा? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदरातील ही तफावत दूर करावी. अन्यथा ऊस पळवापळवीचे प्रकार वाढतील आणि त्याचा फटका शेतकरी तसेच कारखानदारीलाही बसेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. नगर जिल्ह्याची साखर उतारा क्षमता सोलापूरपेक्षा अधिक असल्याचा दावा करत शेट्टी म्हणाले की, ३४१ रुपये प्रतिटक्का रिकव्हरीच्या हिशेबाने ११ टक्के रिकव्हरीसाठी ३७५१ रुपये दर होतो. मात्र आम्ही ३७५१ रुपयांची मागणी न करता केवळ ३७०० रुपये मागत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना हा दर देण्यास कारखानदारांनी टाळाटाळ करू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बैठकीत तोडगा नाही, आता दुसऱ्या फेरीकडे लक्ष (Sugarcane price)
ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. राज्य सहकारी बँकेच्या धर्तीवर जिल्हा बँकेने साखरेचे मूल्यांकन चार हजारांवरून साडेचार हजार रुपये करावे. मूल्यांकन वाढल्यास कारखान्यांना आर्थिक आधार मिळेल आणि ऊसदराचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारी टिकली पाहिजे, कारखाने किमान १२० दिवस चालले पाहिजेत, ही आमचीही भूमिका आहे. मात्र कारखानदारीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाकारता येणार नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
पहिल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची चिन्हे आहेत. आता दुसऱ्या बैठकीत तरी कारखानदार आणि प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र ३७०० रुपयांच्या पहिल्या उचलीच्या मागणीवर कोणतीही तडजोड नाही, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.


