Suicide : पाथर्डी : खरवंडी (Kharwandi) येथील प्रदीप धोंडीराम केळगंद्रे (वय अंदाजे ३५) या युवकाने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची (Suicide) धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी त्यांच्या सासू-सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत मुलाचे वडील धोंडीराम तानाजी केळगंद्रे (वय ६८, रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा : बदलत्या परिस्थितीत पौष्टिक तृणधान्यांना अनन्यसाधारण महत्त्व : डॉ. प्रशांत बोडके
धमकी देण्यात आल्याचा आरोप
त्यानुसार, प्रदीप केळगंद्रे याचा विवाह ७ फेब्रुवारी २०२२ रोजी मिरजगाव येथील योगिता युवराज इंगळे हिच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरे युवराज विष्णू इंगळे व सासू मालन युवराज इंगळे हे वारंवार घरी येऊन धमक्या देणे, पैसे मागणे, बदनामीची धमकी देणे तसेच फोनद्वारे मानसिक त्रास देत असल्याचे प्रदीपने अनेकदा वडिलांना सांगितले होते. फिर्यादीनुसार, या त्रासामुळे प्रदीप नैराश्यात गेला होता. २४ मे रोजी त्याने गरोदर असलेल्या पत्नीला उपचारासाठी माहेरी मिरजगाव येथे सोडले होते. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून पत्नीला परत नांदवण्यास पाठवणार नसल्याची तसेच मिरजगावला आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पत्नी आणि मुलाशी फोनवर बोलू दिले जात नसल्याची व्यथा (Suicide)
३० मे रोजी सकाळी प्रदीपने आपल्या वडिलांना भेटून पत्नी आणि मुलाशी फोनवर बोलू दिले जात नसल्याची व्यथा व्यक्त केली होती. त्याच दिवशी रात्री त्याने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना ३१ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी प्रदीपने एका कागदावर सासू-सासऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक लिहून मी या दोन व्यक्तींमुळे मरत आहे असा मजकूर लिहिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या चिठ्ठीचा फोटो त्याने मोबाईलवरून व्हॉट्सॲपद्वारे पाठविल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तपास सुरू
पत्नी व मुलाशी संपर्क साधण्यास अडथळे निर्माण करणे, वारंवार धमक्या देणे, मानसिक छळ करणे आणि बदनामीची भीती दाखविणे या कारणांमुळे प्रदीपने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी युवराज विष्णू इंगळे व मालन युवराज इंगळे (रा. मिरजगाव, ता. कर्जत) यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



