
Sujay Vikhe Patil : नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (ADCC Bank Election) सहकार विकास आघाडीने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवत मोठे यश संपादन केले आहे. तर अकोले सोसायटी मतदारसंघातून निवडून आलेल्या संजीवनी शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे सहकार विकास चे संख्याबळ 18 झाली आहे. या विजयाबद्दल खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार मानले. मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू आणि सर्वांना सोबत घेऊन जिल्हा बँकेची पुढील वाटचाल करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नवनिर्वाचित संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, रणजीतसिंह देशमुख, आमदार आशुतोष काळे, सचिन जगताप, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सिताराम गायकर, कारभारी जावळे, संगीता वाघ, राजश्री घुले, करण ससाने, दत्तात्रय पानसरे, गणपतराव सांगळे, अनुराधाताई नागवडे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, सहकार विकास आघाडीच्या १८ उमेदवारांपैकी १७ उमेदवार विजयी झाले आहेत. अकोले तालुक्यातील गोविंद शिंदे यांनी अकोले सोसायटी मतदारसंघातून विजय मिळविला आहे. एका जागेचा अपवाद वगळता आघाडीला सर्वत्र यश मिळाले. या विजयाचे श्रेय जिल्ह्यातील मतदारांना जाते. त्यांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेली संधी याला कधीही तडा जाऊ देणार नाही.
सहकार क्षेत्रातील निवडणुकीत सर्व उमेदवार तुल्यबळ असतात. त्यामुळे काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही, तरी त्याकडे फार मोठी घटना म्हणून पाहण्याची गरज नाही. सहकार क्षेत्रात निवडणूक होणे ही लोकशाही प्रक्रियेचाच एक भाग आहे. या निवडणुकीत कुठेही चिखलफेक किंवा वैयक्तिक टीका झाली नाही, ही समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पारनेरच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली (Sujay Vikhe Patil)
पारनेरमधील निकालाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, एका बाजूला खासदार आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही लढत होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माझा उमेदवार पराभूत झाला असून, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. तसेच पारनेरच्या विजयाबद्दल खासदार निलेश लंके यांचे अभिनंदन आहे.
अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पसंतीने (Sujay Vikhe Patil)
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले की, अध्यक्षपदासाठी १८ संचालक इच्छुक असू शकतात. मात्र, सहकार विकास आघाडीत जो निर्णय होईल, तो सर्वांच्या संमतीने घेतला जाईल. सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय प्रक्रिया राबविण्यात येईल. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पसंतीनेच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. १८ संचालकांमधून अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.


