TET Exam : नीट परीक्षा पेपर फुटीचे (NEET Exam Paper Leak) प्रकरण देशभर गाजत असताना आता महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) चा पेपर ठाण्यात फुटला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे उद्या (२८ जून) रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी राज्यभर मोठी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीमुळे परीक्षाच रद्द करण्याची वेळ आली आहे. यामुळे उमेदवारांनाही मोठा मनस्ताप झाला आहे. रद्द झालेली परीक्षा केव्हा होणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि.२८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या.
भिवंडी येथील इसमांकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती
तथापि, आज दि. २७ जून, २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याने परीक्षा पुढे ढकलली(TET Exam)
सदर परिस्थिती लक्षात घेता दि.२८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.



