Theft : पाथर्डी येथील नऊ लाखांच्या लुटीतील दुचाकी सापडली; शिरूर कासारमधून चोरी झाल्याचे उघड

पाथर्डी हद्दीतील डोंगराळ भागात एक दुचाकी पोलिसांच्या निदर्शनास

0
Theft : पाथर्डी येथील नऊ लाखांच्या लुटीतील दुचाकी सापडली; शिरूर कासारमधून चोरी झाल्याचे उघड
Theft : पाथर्डी येथील नऊ लाखांच्या लुटीतील दुचाकी सापडली; शिरूर कासारमधून चोरी झाल्याचे उघड

Theft : पाथर्डी : शहरातील अजंठा चौक परिसरात दिवसाढवळ्या ६२ वर्षीय दीपक येळाई यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून नऊ लाख रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) व पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. या तपासात लुटीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी पाथर्डी तालुक्यातील भालगाव-शिरूर कासार मार्गादरम्यान पाथर्डी शिवारातील डोंगराळ भागात आढळून आली असून, पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे तपासात ही दुचाकी काही महिन्यांपूर्वी शिरूर कासार येथून चोरीला (Theft) गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

नक्की वाचा : स्वतःमधील अहिल्येला जागृत करण्यासाठी ‘अहिल्येच्या लेकी’ हा प्रेरणादायी उपक्रम

बॅग हिसकावून पलायन

प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन जात असलेल्या येळाई यांच्यावर गुरुवारी (ता. १) दुपारी अजंठा चौक परिसरात चार अज्ञात आरोपींनी हल्ला करून रोकड लुटली होती. दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी येळाई यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर आरोपींनी धारदार हत्याराने त्यांच्या हातावर वार करून कुकरीचा धाक दाखवत बॅग हिसकावून पलायन केले होते. या घटनेनंतर पाथर्डी पोलिसांसह अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला. आरोपी शिरूर कासारच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दिशेनेही पोलिसांनी शोधमोहीम राबविली. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार (Theft)

दरम्यान, तपासादरम्यान पाथर्डी-शिरूर कासार मार्गादरम्यान पाथर्डी हद्दीतील डोंगराळ भागात एक दुचाकी पोलिसांच्या निदर्शनास आली. संशयावरून पोलिसांनी ही दुचाकी ताब्यात घेत तिची माहिती तपासली असता ती शिरूर कासार येथून काही महिन्यांपूर्वी चोरीला गेल्याचे समोर आले. दुचाकी चोरीला गेल्यानंतर तिच्या मालकाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे लूट प्रकरणातील आरोपींनी ही चोरीची दुचाकी वापरली असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. दुचाकीचा वापर कोणी केला, ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि लुटीनंतर आरोपींनी ती डोंगराळ भागात का सोडून दिली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, आरोपींनी वापरलेल्या दोन्ही दुचाकींचा शोध घेणे, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविणे तसेच चोरीच्या दुचाकीचा आरोपींशी संबंध जोडणे, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपींनी चेहऱ्यावर मास्क व रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.लुटीचा संपूर्ण उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू असल्याने या प्रकरणाचा तपास कधी लागतो, याकडे पाथर्डी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.