Traffic congestion: कर्जतला घडली मोठी वाहतूक कोंडी; वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकेला फटका

दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच-लांब रांगा

0

Traffic congestion: कर्जत: येथील बसस्थानकच्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळे एक प्रवेशद्वार बंद झाले आहे. त्यामुळे एसटी आवक-जावक करताना पडणारी मर्यादा, त्यात सोमवार कर्जतचा आठवडे बाजार आणि मुख्य रस्त्यावर बाजारकरूंची अस्ताव्यस्त वाहने यामुळे दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तब्बल अर्धा तास चांगलीच वाहतूक कोंडी (Traffic congestion) जाणवली. या वाहतूक कोंडीत तब्बल दहा ते पंधरा मिनिटे एक रुग्णवाहिका अडकून पडली. चालकाने सतत सायरन वाजवत राहिल्याने इतर वाहन चालकांनी वेळेचे भान राखत त्या रुग्णवाहिकेस रस्ता दिला.

अवश्य वाचा- त्र्यंबकेश्वर आणि चाैंडी येथून निघालेल्या दोन्ही जलयात्रा शिर्डीतून मार्गस्थ

दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच-लांब रांगा (Traffic congestion)

कर्जत शहरातील वाहतूक कोंडी पुन्हा एकदा चांगलेच डोकेदुखी ठरत आहे. मागील काही महिन्यांपासून दादा पाटील महाविद्यालय ते भांडेवाडी दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत पार पाडावी लागते. यात सोमवारी (ता.२७) आठवडे बाजार असल्यास बाजारकरू यासह विक्रेते यांची वाहने रस्त्यावर असल्यास त्यात अधिक भर पडते. सध्या कर्जत बसस्थानकात सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून बसस्थानकाचे एक प्रवेशद्वार या कामामुळे तात्पुरते बंद ठेवण्यात आले. याचा अतिरिक्त भार दुसऱ्या बाजूच्या प्रवेशद्वारावर पडत आहे. एसटीची लांबी जास्त असल्याने आत येताना आणि बाहेर पडताना मोठा टर्न घ्यावा लागत असल्याने काही काळ वाहतूक थांबली जाते.

त्यात सोमवार, आज (ता.२७) दुपारी सव्वा दोन वाजता कर्जतचा आठवडे बाजार यासह शाळेला सुट्ट्या लागल्याने बाहेरगावी जाण्यासाठी कुटुंबाची लगबग आणि कर्जत शहर आणि परिसरातील नागरिक आठवडे बाजारासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने मोठी वाहतूक कोंडी घडली. दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. त्यात अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी-चारचाकी मोठ्या अडथळा ठरत होत्या. यातच एक रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत तब्बल दहा ते पंधरा मिनिटे अडकून पडली होती. इमर्जन्सी असल्याने रुग्णवाहिका चालकाने सतत सायरन वाजवत ठेवल्याने कोंडीत देखील इतर वाहन चालकांनी शक्य होईल तसा रस्ता मोकळा करीत रुग्णवाहिकेस मार्ग दाखविला. वाहतूक कोंडीवर पोलीस प्रशासन काम करीत असले तरी त्यांना पण कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध करणे शक्य नसल्याने वाहतूक नियंत्रण करणे अवघड जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here