Election : नगर : जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी व रिक्त झालेल्या सदस्यपदांच्या ८५ जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. यातील सदस्यपदाच्या बिनविरोध आलेल्या जागा वगळून इतर सर्व जागांसाठी आज (ता. २८) सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० यावेळेत मतदान सक्रिय सुरू आहे. २९ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा : कर्जतला घडली मोठी वाहतूक कोंडी; वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकेला फटका
पोलिस बंदोबस्त तैनात
२०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजीनामा, निधन, अनहर्त यासह इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यात ८५ ग्रामपंचायत सदस्य व ५ सरपंचपदांचा समावेश होता. या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. संबंधित तहसीलदार यांनी मतदानाचे पूर्ण नियोजन केले असून मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. थेट सरपंचपदासाठी अकोले, राहरी, नेवासा, शेवगाव व जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होत असून आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नक्की पहा : महापालिकेचे कर्मचारी जनगणनेत व्यस्त; दाखल्यांसाठी नागरीक त्रस्त
६४ जागांसाठी मतदान (Election)
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे ग्रामपंचायत निवडणूक शाखेने सांगितले. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीच्या ८५ सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यातील २१ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यात अकोले तालुक्यातील ७ जागा, शेवगाव व कोपरगाव तालुक्यातील प्रत्येकी ३ जागा, नगर व नेवासा तालुक्यातील प्रत्येकी २ जागा, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर व पाथर्डी तालुक्यांतील प्रत्येकी १ जागा बिनविरोध निवडून आली आहे. यामुळे आज ६४ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे.



