Trekking : शिवदुर्गचा भोरगिरी-भीमाशंकर जंगल ट्रेक यशस्वी; १०५व्या मोहिमेत १५३ मावळ्यांचा सहभाग

0
Trekking : शिवदुर्गचा भोरगिरी-भीमाशंकर जंगल ट्रेक यशस्वी; १०५व्या मोहिमेत १५३ मावळ्यांचा सहभाग
Trekking : शिवदुर्गचा भोरगिरी-भीमाशंकर जंगल ट्रेक यशस्वी; १०५व्या मोहिमेत १५३ मावळ्यांचा सहभाग

Trekking : नगर : महाराष्ट्रातील ट्रेकिंग विश्वात नावाजलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने सलग आठव्या वर्षी श्रावण महिन्यात भोरगिरी ते भीमाशंकर आठ किलोमीटर जंगल ट्रेकचे आयोजन करण्यात आले. शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम प्रमुख अक्षय ओहळ आणि शिवदुर्ग शिलेदार टीमच्या नियोजनातून झालेल्या या १०५ व्या मोहिमेत पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून १५३ सदस्यांनी सहभाग घेतला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राज्यभरातील मावळ्यांचा सहभाग

अहिल्यानगर, श्रीगोंदा, कर्जत, पुणे, दौंड, बारामती, शिरूर, खेड आणि राजगुरूनगर तालुक्यातील शिवदुर्ग मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते. बालमावळे, युवा, महिला आणि पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग हे या मोहिमेचे वैशिष्ट्य ठरले. ऊन, वारा, पाऊस आणि धुक्याचा अनुभव घेत निसर्गरम्य जंगलातून केलेला हा ट्रेक सहभागींसाठी अविस्मरणीय ठरला. शिवदुर्गच्या परंपरेनुसार भोरगिरी येथे अभिनेते रामभाऊ जगताप यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. गुप्त भीमाशंकर येथील साक्षी विनायक गणपती मंदिराजवळ नागपंचमी निमित्त महिला रणरागिणींच्या वतीने वारुळाची पूजा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू खारीचे दर्शनही अनेकांना झाले.

नक्की वाचा : कौठेमलकापूरच्या प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्पाला विरोध

८१ वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम (Trekking)

या मोहिमेदरम्यान शिवदुर्गच्या वतीने ८१ वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जंगल ट्रेकच्या मार्गावर आढळलेले प्लॅस्टिक संकलित करून पाच गोण्यांमध्ये भरून योग्य ठिकाणी सुपूर्द करण्यात आले. ‘सर्व प्लॅस्टिक आपण गोळा करू शकत नसलो, तरी आपल्या दोन हातांनी शक्य तितके प्लॅस्टिक उचलायचे,’ हा संदेश देत बालमावळ्यांमध्येही पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. धबधबे आणि गुप्त भीमाशंकर परिसरात सहभागी सदस्यांनी निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला. ग्रामीण भागातील महिला व कुटुंबांना सहकुटुंब गडकिल्ले आणि जंगल ट्रेकिंगची संधी देणारे शिवदुर्ग हे एक विश्वासाचे व्यासपीठ बनले असल्याच्या प्रतिक्रिया महिला रणरागिणींनी व्यक्त केल्या.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संगिता इंगळे, अक्षय ओहळ, अमोल बडे, प्रा. प्रमोद परदेशी, चेतन चौधरी, सुनील मोरे, डॉ. संजय वाघमोरे, गणेश कविटकर, प्रा. अमर भोसले, अभिनेते रामभाऊ जगताप, तारा चांदगुडे, महेश क्षीरसागर, नीरज पाडळे यांच्यासह शिवदुर्ग टीमने योगदान दिले.