Unseasonal Rains : पाथर्डी: तालुक्यात रविवारी व सोमवारी अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटात (Lightning Strike) वीज कोसळून दोन जनावरे मृत्युमुखी पडली तर चार घरांची पडझड झाली. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन वाहतूक ठप्प झाली. तसेच शेती व फळबागांचे मोठे नुकसान झाले. सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून जनजीवन विस्कळीत केले. रविवार (११ मे) आणि सोमवार (१२ मे) रोजी अवकाळी पावसाने प्रचंड तडाखा दिला असून, वादळी वाऱ्याने झोडपून काढले.
अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर
सोनोशी येथे तीन घरांची पडझड
रविवारी आणि सोमवारी सायंकाळी दैत्य नांदूर व सोनोशी परिसरात अचानक वातावरण ढगाळ होऊन वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब हलले, आणि वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. रविवारी दैत्यनांदूर येथे एक व सोनोशी येथे तीन घरांची पडझड झाली असून, गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी पुन्हा पाथर्डी तालुक्यातील वातावरणाने पलटी घेतली. दुपारी विजेच्या कडकडाटासह, भीतीदायक आवाजात वीज कोसळली. तिनखडी येथे एका बैलाचा, तर माणिकदौंडी येथे एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. पाथर्डी शहरातील लोणार गल्ली येथे वीज कोसळली. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दरम्यान सोमवारी कोरडगाव, जिरेवाडी, दैत्य नांदूर,परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. कोरडगावहून बोधेगावकडे जाणाऱ्या नदीवरील पुलाखालून जोरदार पाणी वाहत होते. तसेच दैत्यनांदूर येथील शिवाच्या आंब्याच्या नदीला आलेल्या पूरामुळे पुलावरून पाणी वाहू लागले आणि वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही नैसर्गिक आपत्ती घातक ठरली आहे.
भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान (Unseasonal Rains)
वाऱ्यासह पावसामुळे ज्वारी, गहू, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, डाळिंब यासारख्या फळपिकांचे फळ गळून पडले असून, जनावरांसाठी साठवलेला चारा भिजून नष्ट झाला आहे. ग्रामीण भागात विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत असून नागरिक व शेतकरी वर्गाकडून तातडीने नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. मे महिन्याच्या या काळात असा वादळी पाऊस आणि गारपीट अत्यंत दुर्मीळ असून, हवामानातील बदलामुळे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. प्रशासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी अपेक्षा संपूर्ण तालुक्यातून व्यक्त होत आहे.