Weather Update : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

0
Weather Update : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Weather Update : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Weather Update : नगर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यास ६ व ७ जुलै २०२६ रोजी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून या कालावधीत अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून संभाव्य जीवितहानी व वित्तीय हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे.

हेही वाचा : विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; संबंधितांवर कारवाईची मागणी

सतर्कतेचा इशारा

अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पर्जन्य झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा व गोदावरी नद्यांवरील धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून २७ हजार ८४७ क्युसेक, तर गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील पर्जन्यमानानुसार या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की पहा : पाथर्डीतील पाच गावांत गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ; शेकडो ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे धाव

मदतीसाठी संपर्क (Weather Update)

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मदतीसाठी जवळच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व ०२४१-२३५६९४० तसेच ११२ व १०७७ या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.