Wrestling : पारनेरकरांनी अनुभवला निकाली कुस्त्यांचा थरार;  सोलकर व कावरेने वेधले लक्ष 

अक्षय कावरे याने संयमी आणि चपळ खेळ करत त्याचे सर्व डावपेच लावले उधळून

0
Wrestling : पारनेरकरांनी अनुभवला निकाली कुस्त्यांचा थरार;  सोलकर व कावरेने वेधले लक्ष
Wrestling : पारनेरकरांनी अनुभवला निकाली कुस्त्यांचा थरार;  सोलकर व कावरेने वेधले लक्ष

Wrestling : पारनेर : शहरात रविवारी (ता. १०) आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती (Wrestling) मैदानात नामांकित मल्लांच्या झुंजींनी कुस्तीशौकिनांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. पारंपरिक माती कुस्तीतील विविध डावपेचांचा थरार अनुभवण्यासाठी नगरसह पुणे (Pune) जिल्ह्यातील हजारो कुस्तीप्रेमींनी मैदानावर गर्दी केली होती. धोबीपछाड, टांग, मोळी, लंग, ढाक, चक्री, गरदनी, यकचॅक, दुहेरी पट, एकलंघी आणि इराणी यांसारख्या थरारक डावांचा नजराणा मल्लांनी (Wrestlers) सादर करत मैदान दणाणून सोडले.

नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे सशस्त्र दरोडा; पती-पत्नी गंभीर जखमी

‘यकचॅक’ डाव टाकत समिर शेख यास केले चितपट

या मैदानातील पहिल्या क्रमांकाची तब्बल एक लाख रुपयांच्या इनामाची कुस्ती कोल्हापूरच्या कालीचरण सोलकर आणि सोलापूरच्या समिर शेख यांच्यात रंगली. दोन्ही मल्लांनी आक्रमक आणि तितकाच चुरशीचा खेळ करत उपस्थितांची वाहवा मिळवली. जवळपास पंधरा मिनिटे चाललेल्या या नेत्रदीपक झुंजीत कालीचरण सोलकर याने अचूक ‘यकचॅक’ डाव टाकत समिर शेख यास चितपट केले. या विजयाने मैदानात एकच जल्लोष उसळला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कावरे याने दुहेरी पट डाव काढत लढत जिंकली (Wrestling)

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती स्थानिक मल्ल व पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालीमचा पठ्ठा अक्षय कावरे आणि मामासाहेब मोहळ तालीमचा सुरेश बंडगर यांच्यात झाली. तब्बल वीस ते बावीस मिनिटे रंगलेल्या या झुंजीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सुरेश बंडगर याने एकलंघी, इराणी आणि यकचॅक यांसारखे डाव वापरत अक्षय कावरेला चितपट करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, अक्षय कावरे याने संयमी आणि चपळ खेळ करत त्याचे सर्व डावपेच उधळून लावले. अखेरीस अक्षय कावरे याने दुहेरी पट डाव काढत ही लढत जिंकली आणि मैदानातील उपस्थितांकडून वहावा मिळविली. 

इतर २५ ते २७ कुस्त्याही ठरल्या प्रेक्षणीय

मुख्य लढतींसह इतर २५ ते २७ कुस्त्याही प्रेक्षणीय ठरल्या. चितपट कुस्त्यांचा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी मैदानात मोठी गर्दी केली होती. प्रत्येक डावानंतर उसळणारा जल्लोष आणि मल्लांच्या दमदार खेळामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. इंदापूर येथील हलगी पथकाने आपल्या दमदार वादनाने मैदानातील वातावरण आणखी रंगतदार केले. समालोचक अक्षय मुळूक यांनी प्रभावी समालोचन करत उपस्थितांसमोर कुस्तीचा इतिहास, परंपरा आणि विविध डावपेच जिवंत केले.

कुस्तीशौकिनांची मोठ्या संख्येने हजेरी

ज्येष्ठ पैलवान स्व. मार्तंडनाना पठारे यांचे बंधू किसन भिकाजी पठारे यांच्या हस्ते तसेच माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या उपस्थितीत मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या मैदानासाठी नगर आणि पुणे जिल्ह्यातील मल्ल, पंच व कुस्तीशौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

अनेक मान्यवर उपस्थित

यावेळी, शाहीर भास्कर गायकवाड, वसंत चेडे, विजय औटी, कांतीलाल ठाणगे, दत्ता आंबुले, पांडूरंग खोडदे, दगडू शेरकर, दादाभाऊ नरसाळे, बाबाजी वाळुंज, साहेबराव पवार, रावसाहेब चत्तर, पोपट गांगर्डे, राष्ट्रीय पंच डॉ. संतोष भुजबळ, पंच गणेश जाधव, आर. डी. औटी, धनंजय खर्से, प्रमोद गोडसे, संभाजी मगर, अशोक कावरे, दत्ताशेठ कुलट, सहदेव तराळ, अर्जुन चौधरी, अर्जुन भालेकर, पंढरीनाथ चेडे, अकील शेख, संतोष औटी, डॉ. सचिन औटी, रामदास औटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.