नगर : बारामती (Baramati) पोटनिवडणुकीच्या दिवशीच रोहित पवार (Rohit Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावरून २०२९ च्या निवडणुकीची देखील चर्चा सुरू झाली. या सर्व बाबतीत युगेंद्र पवार (Yugendra pawar on baramati) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर रोहित पवारांच्या बारामतीच्या फेऱ्या वाढल्यात. त्यांना २०२९ मध्ये तिथून लढायचं आहे का? या प्रश्नावरती देखील युगेंद्र पवारांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.
बारामतीत रोहित पवारांच्या सुद्धा चक्रा बऱ्याच वाढल्या (Yugendra Pawar)
रोहित पवारांना स्वतःला बारामती लढायची आहे असं काही आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना युगेंद्र पवार म्हणाले, रोहित दादा असं का बोलले किंवा त्यांना नक्की काय करायचं हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. इतक्यात बारामतीत रोहित पवारांच्या सुद्धा चक्रा बऱ्याच वाढल्या आहेत, नक्की काय सुरू आहे, या प्रश्नावर उत्तर देताना युगेंद्र पवार म्हणाले, नाही, ते बारामतीच नाही तर महाराष्ट्रामध्ये ते फिरतात. बारामतीला असं सिंगल आउट करून चालणार नाहीत. ते परवा कोल्हापूरमध्ये पण होते. अकोल्याला गेलेले, नाशिकला होते, सगळीकडे ते फिरत आहेत.
‘आता पवार विरुद्ध पवार लढाई नको’ (Yugendra Pawar)
रोहित पवार यांनी २०२९ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली. २०२९ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात, जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते, असं जे रोहित पवार म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख आहे. पण, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहेत. आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही, अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार यांनी परखडपणे भूमिका मांडली.



