Impact Of The War : श्रीगोंदा : “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युद्ध (War) सुरू आहे, निर्यात (Export) ठप्प आहे, “अशी भीती दाखवून श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक (Grape Growers) शेतकऱ्यांची स्थानिक व्यापाऱ्यांकडून पद्धतशीरपणे लूट सुरू आहे. जागतिक घडामोडींचा बागुलबुवा उभा करून व्यापाऱ्यांनी संगनमताने द्राक्षाचे दर १० ते १५ रुपयांनी पाडले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
नक्की वाचा : राजूर येथे उद्या गाव बंदसह रास्ता रोको

बागायतदारांकडून संताप व्यक्त
श्रीगोंदा तालुक्यात एकूण १६४९ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे नंदनवन फुलले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका लोणी व्यंकनाथ (६९९ हेक्टर), श्रीगोंदा (३१३ हेक्टर), बेलवंडी (२६६ हेक्टर), चिंभळा (१५६ हेक्टर ), आढळगाव (९९.४ हेक्टर), कोळगाव, पेडगाव, काष्टी व इतर (१२३.५ हेक्टर) पट्ट्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांनी मागील ५-६ दिवसांपासून खरेदीमध्ये घट केली आहे. शेतकऱ्यांकडे माल साठवण्याची सोय नसल्याचा फायदा हे व्यापारी घेत आहेत. रशिया-युक्रेन किंवा आखाती देशांतील युद्धाचा संबंध थेट स्थानिक विक्रीशी जोडून आमची लूट केली जात आहे,” असा संताप बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.
अवश्य वाचा : शेंडी-भंडारदरा येथे चौघांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत
खरेदीत मोठी घट (Impact Of The War)
कष्टाने पिकवलेला माल मातीमोल भावात विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. गेल्या ५-६ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी खरेदीत मोठी घट केली आहे. प्रत्यक्षात पुणे, मुंबईसह स्थानिक बाजारपेठांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे द्राक्षाची मागणी वाढली असून किरकोळ दर २० ते ३० रुपयांनी वधरले आहेत. ग्राहकांना महाग दराने द्राक्ष विकत घ्यावी लागत असताना, उत्पादक शेतकऱ्याला मात्र कवडीमोल भाव दिला जात आहे. व्यापाऱ्यांनी आपसात ‘युती’ करून माल थांबून ठेवला आहे, जेणेकरून साठवणूक क्षमता नसलेला शेतकरी हतबल होऊन कमी दरात माल विकेल.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
कोट्यवधी रुपयांची उलाढाल धोक्यात
व्यापाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल धोक्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महसूल प्रशासनाने या प्रकारात तात्काळ लक्ष घालून दराची लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. व्यापाऱ्यांच्या ‘युती’मुळे दर पाडले जात असताना शासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



