Madhi Yatra : पाथर्डी : यांत्रिकीकरणाच्या युगातही (Mechanization) गाढवांचे महत्त्व कायम आहे. श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रेनिमित्त (Madhi Yatra) भरलेल्या प्रसिद्ध गाढवांच्या बाजारात यंदा गाढवांनी मोठा भाव खाल्ला आहे. खरेदीदारांची गर्दी जास्त आणि विक्रेत्यांची संख्या कमी असल्याने गाढवांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. राज्यातील सर्वांत मोठ्या गाढव बाजारात केवळ २०० गाढवे विक्रीसाठी आली असून, गुजरातच्या (Gujarat) काठेवाडी गाढवांना विशेष मागणी आहे.
नक्की वाचा : अक्षय कर्डिले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; कारवाईची मागणी

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किंमतीत तेजी
फाल्गुन कृष्ण चतुर्थी, रंगपंचमी आणि नाथषष्ठी या तीन दिवसांच्या बाजारात मढी येथील गाढवांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. गाढवांच्या वयानुसार त्यांचा भाव ठरतो. गावरान गाढवांची किंमत १० हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत आहे, तर काठेवाडी (गुजराती) गाढवांची किंमत ३० हजार ते ९० हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किंमतीत तेजी आली आहे. गाढवांची आवक कमी झाल्याने मागणी वाढली आहे. ग्राहक जास्त आणि विक्रेते कमी असल्याने भाव गगनाला भिडले आहेत असे व्यापारी अविनाश बोरुडे यांनी सांगितले.
अवश्य वाचा : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष
वर्षभरात फक्त चार ठिकाणी भरतो गाढवांचा बाजार (Madhi Yatra)
राज्यात वर्षभरात फक्त चार ठिकाणी एकदाच गाढवांचा बाजार भरतो. यात देऊळगाव राजा (बुलढाणा), जेजुरी (पुणे), मढी (अहिल्यानगर) आणि माळेगाव (नांदेड) या ठिकाणांचा समावेश आहे. मढीचा बाजार यात सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध आहे. गाढवांचा उपयोग आजही वीटभट्ट्यांसाठी लगणारी माती आणि वाळू वाहतुकीसाठी होतो. गड-किल्ल्यांवर सामान नेण्यासाठी, उंच डोंगराळ भागात विविध वस्तू घेऊन जाण्यासाठी गाढवांचा मोठा वापर केला जातो. विशेष म्हणजे, गाढवाचे दूध लहान मुलांच्या औषधांसाठी वापरले जाते, ज्यामुळे त्यांची मागणी आणखी वाढली आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
दुर्गम भागात गाढव हे विश्वसनीय साथीदार
यांत्रिकीकरणाच्या काळात ट्रॅक्टर आणि ट्रक उपलब्ध असूनही, दुर्गम भागात गाढव हे विश्वसनीय साथीदार ठरतात. डोंगराळ रस्त्यांवर मशिन्स पोहोचू शकत नाहीत तिथे गाढवच उपयोगी पडतात असे अमोल धोत्रे या व्यापाऱ्याने सांगितले. गुजरातच्या काठेवाडी प्रांतातील गाढवांना मजबूत आणि टिकाऊ समजले जाते, त्यामुळे त्यांची मागणी सर्वाधिक आहे.या बाजारात गाढवांच्या खरेदी-विक्रीसाठी दूरवरून लोक येतात. मात्र, यंदा पुरवठा कमी आणि भाव दुप्पट असल्याने अनेक ग्राहक निराश होऊन परतत आहेत. यात्रेनिमित्त भरलेल्या या बाजाराने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
गाढवाची किंमत त्याच्या दातावरून ठरते
गाढवाच्या जाती व प्रकृतीनुसार त्याची किंमत ठरवली जाते. गाढवाचे वय प्रामुख्याने त्याच्या दातांवरून निश्चित केले जाते आणि त्यानुसार बाजारभाव ठरतो. काठेवाडी जातीच्या गाढवांना बाजारात चांगली मागणी असते. या गाढवांची उंची-लांबी चांगली असून दिसायलाही आकर्षक असतात. तसेच माल वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने व्यापाऱ्यांकडून त्यांना अधिक पसंती दिली जाते, अशी माहिती व्यापारी दादू गोटीराम शिंदे यांनी दिली.



