नगर: दुसऱ्या लग्नाचा मोह एका अभियंत्याला चांगलाच नडला आहे. पहिल्या लग्नाची ‘फाईल’ क्लोज न करताच दुसरी ‘विंडो’ ओपन करण्याचा मोह या महाशयांना महागात पडला. लग्नाच्या मांडवात जाण्याऐवजी साखरपुड्यातच डाव मोडला. पहिले लग्न लपवून दुसऱ्या लग्नाची तयारी (Preparing for a second marriage while concealing the first) करणाऱ्या एका अभियंत्याचा बनाव समोर आल्याची घटना अकोले तालुक्यात (Akole Crime) उघडकीस आली आहे. या प्रकरणी निखिल प्रकाश हासे याच्यासह त्याचे आई-वडील व इतर नातेवाईक, अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतल आहे.
नक्की वाचा: अक्षय तृतीयेला सोनं स्वस्त होणार की आणखी महागणार? आजचे दर किती?
नेमकं घडलं काय? (Akole Crime)
हासे कुटुंब हे रत्नागिरीत राहत असून, वडील पशुवैद्यकीय अधिकारी, आई शिक्षिका, मुलगा पुण्यात इंजिनियर, अशी माहिती एका विवाहाच्या वेबसाइटवर आली आणि मुलगी व तिचे नातेवाईक या माहितीला फसले. एक हजार लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला आणि हे प्रकरण अचानक उघडकीस आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल हासे याने पहिला विवाह झाल्याची बाब लपवून स्वतःला अविवाहित दाखवत दुसऱ्या मुलीशी लग्न ठरविले. लग्नासाठी सोनं, दागिने व रोख रक्कम घेत साखरपुड्यापर्यंतची तयारीही करण्यात आली होती. मात्र संशय आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी सखोल चौकशी केली, या चौकशीत त्याचा पहिला विवाह झाल्याचे उघड झाले.
अवश्य वाचा: अखेर न्याय मिळाला! पत्नीची हातोड्याने हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप
निखिल हासे पोलिसांच्या ताब्यात (Akole Crime)
या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत निखिल हासे याला ताब्यात घेतले. त्याच्यासह आई-वडील व इतर नातेवाइकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून घेतलेले दागिने व रक्कम परत मिळविण्यासाठीही पोलिस प्रयत्न करत आहेत. हा प्रकार ‘हायप्रोफाइल’ फसवणुकीचा असून, आणखी कोणाची अशी फसवणूक झाली आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिली. मात्र या घटनेमुळे विवाह जुळवताना योग्य ती खातरजमा करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली.



