
Water Resources Department : नगर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ अंतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने संगमनेर, अकोले, चितळवेढे व पाथर्डी परिसरात ‘शेतकरी व पाणी वापर संस्था संवाद’ उपक्रम राबविण्यात आला. ‘जलसंपदा आपल्या दारी’ या संकल्पनेतून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व तक्रारींचे जागेवर निराकरण केले.
ग्रामस्थांशी संवाद
पुनर्वसन उपविभाग व ऊर्ध्व प्रवरा धरण उपविभाग, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिगंबर पिंपळगाव नाकविंदा उपसा सिंचन योजनेतील लाभधारक शेतकरी व पाणी वापर संस्थांच्या संचालक मंडळाशी संवाद साधण्यात आला. तसेच ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिंपरणे, देवगाव, हिवरगाव पावसा व जाखुरी या गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधून जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
हेही वाचा: गणवेश-पुस्तकांसाठी सक्ती नको; अन्यथा शाळांवर कारवाई हाेणार, शिक्षण विभागाचा आदेश
पाणी संवर्धनाचे धडे (Water Resources Department)
पिंपरणे येथील विविध कार्यकारी सोसायटी व विठाई कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांना कृती पंधरवड्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जलजागृती करत पाणी संवर्धनाचे धडे देण्यात आले. ऊर्ध्व प्रवरा धरण उपविभाग क्रमांक एक, अकोले यांच्या वतीने धुमाळवाडी व कळस येथे शेतकरी संवाद मोहीम राबविण्यात आली. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेत त्यावर तातडीने उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. चितळवेढे येथील उपविभाग क्रमांक दोन अंतर्गत उजव्या कालव्याच्या किलोमीटर ८५ ते ९२.५१ लाभक्षेत्रातील कनगर व चिंचविहिरे येथे बैठका घेऊन बंदिस्त नलिका वितरण प्रणालीसंदर्भातील अडचणींवर चर्चा करण्यात आली.
नक्की पाहा : पाथर्डीत आंबे खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी
शेतकऱ्यांनी घेतली ‘जलप्रतिज्ञा’ (Water Resources Department)
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार सिंचन शाखेतही विविध उपक्रम राबविण्यात आले. घाटशिळ पारगाव येथील संत वामन भाऊ पाणी वापर संस्था व घाटशिळादेवी पाणी वापर संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधत पाणी बचत, ठिबक सिंचनाचा वापर व वेळेवर पाणीपट्टी भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी कर्मचारी, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी ‘जलप्रतिज्ञा’ घेत पाणी बचतीसाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करण्याचा संकल्प केला. सिंचन व्यवस्थापनातून परिसराच्या समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहन करत उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


