Police custody:संगमनेर: स्वतःला सिद्ध पुरुष भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या वडगाव पान येथील तथाकथित भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. संगमनेर न्यायालयाने गुरुवारी (ता.२३) सुनावणी दरम्यान गडगे याच्या पोलीस कोठडीत (Police custody) आणखी चार दिवसांची वाढ केली असून, आता तो सोमवार २७ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात राजेंद्र गडगे हा गेल्या काही काळापासून भोंदूगिरीचे जाळे पसरवून होता. तो स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून, तंत्र-मंत्राच्या साहाय्याने असाध्य आजार बरे करतो, असा खोटा दावा करत असे. या माध्यमातून त्याने अनेक भोळ्याभाबड्या नागरिकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
अवश्य वाचा- सरस्वती नदीचे प्रदूषण रोखा; श्रीगोंदा नगरपालिकेला आदेश
जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल (Police custody)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी याप्रकरणी पुढाकार घेत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी राजेंद्र गडगे याला अटक केली. त्याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आज (गुरुवारी) दुपारी पोलिसांनी गडगे याला पुन्हा संगमनेर न्यायालयात हजर केले. तपासात आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आणि यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राजेंद्र गडगे याची २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.



