BSNL : पाथर्डी : तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या माणिकदौंडी (Manikdaundi) परिसरात सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलची मोबाईल रेंज (Mobile Coverage) सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी बीएसएनएलच्या (BSNL) उपमंडल अभियंत्यांकडे निवेदन देत आठ दिवसांत सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
निवेदनात म्हटले आहे की,
आजच्या युगात मोबाईल संपर्क ही अत्यावश्यक बाब बनली असताना माणिकदौंडी, पिरेवाडी, जगसोंड तांडा, आल्हणवाडी, बोरसेवाडी, घुमटवाडी, चितळवाडी, पत्र्याचा तांडा, धनगरवाडी या भागात बीएसएनएलचे टॉवर अस्तित्वात असूनही रेंज मिळत नाही. परिणामी नागरिकांना एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिकांना नाईलाजाने खाजगी कंपन्यांकडे वळावे लागते (BSNL)
सरकारी कंपनीची सेवा स्वस्त असून कृषी कार्ड केवळ १४१ रुपयांत व सामान्य रिचार्ज १४७ रुपयांत उपलब्ध आहे. मात्र नेटवर्क नसल्याने नागरिकांना नाईलाजाने खाजगी कंपन्यांकडे वळावे लागत असून त्यासाठी ३०० ते ४०० रुपये खर्च करावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्य व शेतकरी वर्गावर आर्थिक ताण वाढत आहे.या संदर्भात बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता विनोद मुरदारे यांनी आठ दिवसांत सर्व टॉवर, मशिनरी व केबल यांचे देखभाल दुरुस्ती करून सेवा नियमित करण्याचे आश्वासन दिले आहे.
बीएसएनएल सेवा सुधारली नाही तर आंदोलन अटळ – अविनाश पालवे
बीएसएनएल ही सर्वसामान्य व शेतकरी वर्गाला परवडणारी सेवा देणारी सरकारी कंपनी आहे. मात्र सध्या तांत्रिक अडचणींमुळे सेवा अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहे. टॉवर असूनही रेंज मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. ही परिस्थिती तात्काळ सुधारली नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बीएसएनएलने आपली तांत्रिक यंत्रणा सक्षम करून स्वस्त व दर्जेदार सेवा द्यावी, जेणेकरून नागरिकांना खाजगी कंपन्यांकडे वळावे लागणार नाही.



